कॅनमध्ये पंपावर डिझेल भरले अन् पोलिसांना मिळाला क्लू : एरंडोल तालुक्यातील कुविख्यात चोरटा दोन चोरीच्या ट्रॅक्टरसह मोहाडी पोलिसांच्या जाळ्यात
दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त : तांत्रिक विश्लेषणाअंती संशयिताला बेड्या
Erandol’s Sarait tractor stolen in Mohadi police net धुळे : मोहाडी पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या ट्रॅक्टर चोरी प्रकरणी एरंडोल तालुक्यातील मोघण येथील प्रवीण संभाजी पाटील (32, रा.ब्राम्हणे, ता.एरंडोल) या अट्टल संशयीताला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेल्या दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आली. संशयित एका पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल घेताना आढळल्यानंतर त्या धाग्याद्वारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपीच्या मुसक्या बांधल्या.
तांत्रिक विश्लेषणाअंती संशयित जाळ्यात
धुळे तालुक्यातील मोघन येथील रहिवासी अमृत खेमचंद पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एम.एच.18 एन.9089) व ट्रॉली (एम.एच.18 एन.9785) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने 18 मार्च रोजी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक भूषण कोते यांनी तपास पथक तयार केल्यानंतर झोडगे येथील भारत पेट्रोल पंपावर गुन्ह्याच्यावेळी अज्ञात इसमाने कॅनमध्ये डिझेल विकत घेतल्याची माहिती मिळाल्यनंतर सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलीस पथक संशयित प्रवीण पाटीलपर्यंत पोहोचले. प्रवीण हा सराईत गुन्हेगार असून पोलीस कोठडीत त्याने एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्हयातील सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर देखीलचोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील तीन लाख 50 हजार रुपये किंमतीचे स्वराज 744 कंपनीचे ट्रॅक्टर (एम.एच.18 एन.9089), एक लाखाची ट्रॅक्टरची लोखंडी ट्रॉली (एम.एच.18 एन.9785) व सात लाखांचे सोनालिका कंपनीचे निळ्या रंगाचे ट्रॅक्टर असा एकूण 11 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळ्यातील पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीचे सहाय्यक निरीक्षक भूषण कोते यांच्या नेतृत्वाखाली अशोक पायमोडे, शाम निकम, संजय पाटील, किरण कोठावदे, राहुल पाटील, जितेंद्र वाघ, बापूजी पाटील, मुकेश मोरे, जयकुमार चौधरी, चेतन सोनगीरे, प्रितेश चौधरी, विकास शिरसाठ आदींच्या पथकाने केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या कारवाईचे कौतुक करीत याबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमांना सोमवारी दिली.