चार्‍याआडून दारूची वाहतूक : दहा लाखांचा मद्यसाठा जप्त

शिरपूर तालुका राज्य उत्पादन शुल्कची कारवाई : चालक-मालकाविरोधात गुन्हा


Big action of State Excise Department in Shirpur : Liquor smuggling worth 10 lakhs stopped धुळे : सुक्या चार्‍याच्या गोण्यांखाली महिंद्रा पिकअप वाहनातून होणारी मद्य तस्करी रोखण्यात शिरपूर तालुका राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. बोराडी ते मालकातर रस्त्यावरील बोराडी गावाजवळ ही कारवाई करण्यात आली तर पोलिसांना पाहून चालकाने अंधारात वाहन सोडून पळ काढला. वाहनासह दारूसाठा मिळून नऊ लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एक चार चाकी वाहनामधून बोराडी मालकातर रस्त्यावर बोराडी गावाकडून दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बोराडी गावात पहाटेच्या समारास सापळा रचला. हाडाखेडकडून संशयित वाहन (क्र. एमएच 18 बीजी 5819) आल्यानंतर त्यास थांबविण्याच्या इशारा केला असता सदर वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला उभे करून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. वाहनात सुरूवातीला सुका चारा दिसल्याने तो बाजूला केल्यानंतर बिअर आणि व्हिस्कीच्या एकूण एक हजार 920 बाटल्या मिळाल्याने त्या जप्त करण्यात आल. पसार चालक, मालक यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सागर चव्हाण, गणेश जाधव, एस.एस. गोवेकर, शांतीलाल देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, हेमंत पाटील, मनोज धुळेकर, के.एम.गोसावी, दारासिंग पावारा, रवींद्र देसले, नीलेश मोरे यांचे पथकाने ही कारवाई केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !