टाकळीच्या बालकाचा मध्यप्रदेशात करुण अंत

मांजामुळे कापला गेला गळा : टाकळीत शोककळा
मुक्ताईनगर : मध्यप्रदेशातील शहापूर तालुक्यातील खारी येथे पतंगाच्या मांज्यामुळे गळा कापला गेल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील टाकळी येथील निखील चव्हाण या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडलीया . बालकावर गुरूवारी टाकळी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्यप्रदेशातील लोखंड्या येथे यात्रोत्सव सुरू असल्याने टाकळी येथील जितेंद्र दीपचंद चव्हाण हे कुटुंबियांसह बुधवारी गेले होते. खारी येथे नातेवाईकांकडे थांबून ते लोखंड्याकडे जात असताना वाटेत दुचाकीवर समोर बसलेला त्यांचा मुलगा निखील चव्हाणच्या मानेभोवती पतंगाच्या मांज्याने पीळ घेतला व त्याचवेळी चव्हाण यांनी दुचाकी थांबवल्यानंतर त्यांना निखीलच्या मानेतून रक्त येत असल्याचे दिसल्यानंतर तत्काळ निखीलला बर्हाणपूरच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.


