खान्देशातील पठ्ठ्याचे काश्मिरात हॉटेल : व्हायरल व्हिडिओची म्हणूनच होतेय चर्चा
Cardboard Kashmir hotel in Khandesh : The viral video is the reason for the discussion जळगाव : जिद्द, परीश्रम व मेहनतीच्या जोरावर खान्देशातील तरुणाने चक्क काश्मिरात हॉटेल थाटले आहे. मूळच्या मुडी करणखेड्यातील रहिवासी असलेल्या हितेश पाटील या उमद्या तरुणाने पाकिस्तान सीमेजवळील काश्मीरमधील सोनमर्ग येथे हॉटेल थाटले आहे. खान्देशचे सुपूत्र तथा आयएएस अधिकारी संदीपकुमार साळुंखे यांनी अलिकडेच या हॉटेलला भेट दिल्यानंतर तरुणाशी ओळख वाढल्यानंतर त्यांनी तरुणाशी अहिराणीतच संवाद साधला व संवादाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सोशल मिडीयावर संवादाचा व्हिडिओ व्हायरल
संदीप साळुंखे आपल्या परीवारासह काश्मीर फिरायला गेले आहेत. सोनमर्गला पोहोचल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये जेवायला गेले असता तेथे त्यांची हितेश पाटील सोबत भेट झाली. एक खान्देशी तरुण इतक्या लांब येवून स्वत:चे हॉटेल चालवतोय, हे पाहून त्यांना खूपच आनंद झाला. काश्मीरमध्ये खान्देश स्पेशल पिठलं पोळीवर तावं मारल्यानंतर साळुंखे यांनी हितेश सोबत अहिराणीमध्ये संवाद साधला व त्याचा व्हिडीओदेखील तयार केला. हा व्हिडीओ जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.




इच्छाशक्तीने निश्चित मिळणार यश
इच्छाशक्ती असेल तर आपण कुठल्याही परीस्थितीतून जिद्दीने मार्ग काढू शकतो हेच हितेशने दाखवून दिले आहे. तरुणांसाठी हा एक आदर्श आहे. आपल्याला प्रगती करायची असेल, धंदा करायचा असेल तर आपण कुठेही करु शकतो, हे हितेशने दाखवून दिले आहे. खान्देशातील तरुणांना संदेश देतांना हितेश म्हणतो की, कामं धंदा करा, घरमा बठीसनं काय फायदा नयी !