कुंझरच्या बेपत्ता बालकाचा विहिरीत आढळला मृतदेह

चाळीसगाव : तालुक्यातील कुंझर येथील बेपत्ता बालकाचा शुक्रवारी सकाळी विहिरीत मृतदेह आढळल्याने परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची आहे. जयेश श्रावण चौधरी ( 11) असे मृत बालकाचे नाव आहे. तो 8 जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी ही घटना उघडकीस आली.
मेहुणबारे पोलिसात हरवल्याची नोंद
जयेशचे वडील श्रावण चौधरी हे परवा रात्री आठ वाजेच्या सुमारास गावातील राम मंदिरात गट शेतीच्या बैठकीला गेल्यानंतर जयेश हा त्यांच्या मागे गेला मात्र नंतर अचानक बेपत्ता झाला होता. तो न सापडल्याने जयेशचे वडील श्रावण चौधरी यांनी गुरूवारी मेहुणबारे पोलिसात अपहरणाची तक्रार दिली होती. यानंतर शुक्रवारी सकाळी त्याचा थेट मृतदेहच गावातील किशोर गोसावी यांच्या शेतातील विहिरीत आढळला. मेहुणबारे पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन बेंद्रे, उपनिरिक्षक हेमंत शिंदे व कर्मचारी वर्गाने घटनास्थळी धाव घेतली.


