भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात 13 रोजी राष्ट्रीय परीषद

भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र व प्राणिशास्त्र विभागातर्फे सोमवार, 13 जानेवारी रोजी ‘न्यू फ्रंटीयर्स एन बायोलॉजिकल सायन्स एनएफबीएस 2020’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परीषद होत आहे. राष्ट्रीय परीषदेचा मुख्य उद्देश जीवशास्त्राचा चिरकाल विकास व मानवी कल्याणासाठी जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल तसेच जैविक विविधतेचा र्हास थांबवण्यासाठी सरकारी-निमसरकारी संस्था व नागरीरकांनी काय प्रयत्न केले पाहिजेत या सर्व विषयांवर चर्चा व उपाय सांगणे व अमलात आणण्यासाठी जनजागृती करणे हा आहे. तज्ज्ञांची चर्चा घडून आणणे तसेच नवीन संशोधकांना विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देणे हादेखील उद्देश राष्ट्रीय परिषदेचा आहे.
यांची परीषदेला राहणार उपस्थिती
परीषदेचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या हस्ते होईल. प्रमुख अतिथी म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजय नाहाटा तसेच संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे. सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विविध सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रथम सत्रात बीजभाषण कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे प्राणीशास्त्र विभाग प्रमुख तसेच प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ.पी.एस.लोहार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पती विभाग प्रमुख डॉ.हेमलता कोतकर यांचे व्याख्यान होणार आहे.
देशभरातून शंभरावर संशोधक येणार
या परीषदेत गुजरात, उत्तराखंड, छत्तीसगढ व भारतातील विविध राज्यातील शंभराहून अधिक प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. त्यामध्ये पोस्टर, पेपर आणि ओरलद्वारे संशोधन पत्रिकांचे वाचन संशोधक करणार आहेत. या राष्ट्रीय परीषदेत जास्तीत-जास्त संशोधकांनी, शेतकरी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे तसेच राष्ट्रीय परीषदेच्या दिवशी स्पॉट रजिस्ट्रेशनची सोयदेखील करण्यात आली आहे. उपस्थितीचे आवाहन नाहाटा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.मीनाक्षी वायकोळे तसेच संयोजक डॉ.एस.व्ही.पाटील व सहसंयोजक डॉ.डी.के.हिवराळे, संघटन सचिव डॉ.विद्या पाटील, संघटन सचिव डॉ.एम.जे.जाधव यांनी केले आहे.


