भाजपा बैठकीत गोंधळ घालणार्यांवर पक्ष कारवाई करणार

माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन : झालेली घटना निंदणीय
जळगाव : भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांना भाजपा बैठकीत झालेली मारहाण ही निषेधार्थ असून हे कुणालाही अपेक्षित नाही. व्हिडिओ क्लीप पाहून मारहाण करणार्यांवर निश्चित पक्षाकडून कठोर कारवाई होईल, अशी माहिती माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार हरीभाऊ जावळे यांची निवड झाल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.
मारहाण करणार्यांचे निलंबन होणार
महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात भाजपाची मोठी मजबूत पकड असून संघटना मजबूत आहे. माजी आमदार जावळे यांच्या माध्यमातून मोठी फळी जिल्ह्यात निर्माण होणार आहे. भुसावळ शहराध्यक्ष व तालुकाध्यक्षपदाची निवड प्रा.नेवे यांच्या सांगण्यानुसार झाल्याचा समज झाल्याने त्यांना मारहाण झाली तसेच शाहीदेखील फेकली गेल्याने ही घटना निषेधार्थ अशीच आहे. संबंधिताचे व्हिडिओ क्लीप पाहून निलंबन केले जाईल, असेही ते म्हणाले.


