शिरपूरात तरुणाचा खून : चौघा संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक
Murder of youth in Shirpur : Four suspected accused arrested by police शिरपूर : दारूची उधारी वाढल्यानंतर त्यातून वाढलेल्या वादानंतर शहरातील तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली व त्यातून तरुणाचा मृत्यू ओढवला होता. ही घटना रविवारी घडली होती तर या घटनेत राजू सुदाम कोळी (32, रा.वाल्मीकनगर, शिरपूर) या तरुणाचा मृत्यू ओढवला होता. तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणातील चौघा आरोपींना शिरपूर पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. योगेश कोळी, बंटी कोटी, दीपक कोळी व छोटू कोळी (सर्व रा.किस्मत नगर, शिरपूर, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
उधारीच्या पैशांमुळे गेले तरुणाचे प्राण
मयत राजू कोळी यांचा भाऊ राकेश सुदाम कोळी (23, रा.वाल्मीकनगर, शिरपूर) यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ राजू याला दारूचे व्यसन होते त्यामुळे तो किस्मतनगर येथे दारू पिण्यासाठी जात होता. दारूच्या उधारीच्या पैशांमुळे तीन दिवसांपूर्वी त्याचे भांडण झाले व संशयितांनी त्याला शिविगाळ करीत हाता-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पुन्हा रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास राजू हा दारू पिण्यासाठी किस्मतनगर येथे गेला असता सुंदरवाडी रस्त्यावर चौघांनी अडवत पुन्हा बेदम मारहाण केली. या घटनेत तरुणाच्या डोक्याला, पाठीला, पोटाला आणि तोंडावर गंभीर दुखापत झाली. मारहाण होत असल्याचे लक्षात येताच त्याला त्याच्या भावांनी सोडवत घरी आणले मात्र कानातून रक्तस्त्राव झाल्यानंतर डोळादेखील सुजला मात्र त्यानंतर तरुण न उठल्याने त्यास कॉटेज हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले असता डॉ.दिव्या तवर यांनी तपासून मृत घोषित केले.
गुन्हा दाखल होताच अटक
या प्रकरणी सोमवारी दुपारी चार वाजता चौघा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खून प्रकरणातील चौघा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक ए.एस.आसटकर करीत आहेत.