जळगावातील लाचखोर शासकीय ठेकेदाराची पोलिस कोठडी रवानगी

बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पध्दतीने कामावर लावण्यासाठी स्वीकारली होती 25 हजारांची लाच
जळगाव : रावेर बीएसएनएल कार्यालयात कंत्राटी पध्दतीने कामावर लावण्यासाठी 25 हजारांची लाच मागणार्या जळगावातील शासकीय कंत्राटदारास जळगाव एसीबीच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी लाच घेताना अटक केली होती. आरोपीस शुक्रवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. जळगाव तालुक्यातील एका तक्रारदाराला नोकरीला लावण्याच्या आमिषाने गुरुवारी अटकेतील आरोपी सुभाष कोंडाजीराव पवार (फ्लॅट नं.15, गणपती रेसीडेंसी, गणपती नगर, जळगाव) यांनी 25 हजारांची लाच मागितली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. गुरुवारी सायंकाळी जळगावातील आर.आर.हायस्कूलनजीक असलेल्या ओंकार कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयातून आरोपीला लाच घेताच अटक करण्यात आली होती.


