अभिनेता शाहरूख खानच्या मुलाकडे लाच मागणार्‍या कथित अधिकारी समीर वानखेडेविरोधात सीबीआयने नोंदवला गुन्हा


मुंबई : कार्डेलिया क्रूझवर बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्यानंतर 25 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि अन्य तिघांविरोधात सीबीआयने गुन्हा नोंदवल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे नवाब मलिकांवर आरोपांमुळेही अलीकडे चर्चेत आले होते.

देशभरात 29 ठिकाणी सीबीआयची छापेमारी
गुन्हा नोंदविल्यानंतर सीबीआयने वानखेडे यांच्या मालमत्तांसह देशभरात 29 ठिकाणी छापे मारले आहेत. सीबीआयने मुंबई, दिल्ली, रांची (झारखंड) आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे हे छापे मारले आहेत. सीबीआयने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे, त्यांच्या घराची, अन्य ठिकाणांची झड़ती घेतली जात आहे. वानखेडे हे यापूर्वी एनसीबीचे (मुंबई झोन) संचालक होते.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
समीर वानखेडे आणि इतर 4 जणांवर आर्यन खान कथित ड्रग प्रकरणात शाहरुखकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी 25 लाख रुपये उकळल्याचेही आरोपांत म्हटले आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्यासह एनसीबीचे आणखी दोन माजी अधिकारी आणि दोन खासगी व्यक्ती आरोपी आहेत.


कॉपी करू नका.