माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना दिलासा : शिंदे सरकारकडून निलंबन मागे
Suspension of former Mumbai Police Commissioner Parambir Singh reversed मुंबई : महाविकास आघाडीच्या काळात निलंबन करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन शिंदे सरकारने मागे घेवून मविआला धक्का दिला आहे. परमबीर सिंह यांची पोलीस दलातील बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आली असलीतरी सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अधिकार्यांवर शंभर कोटींची दरमहा वसुली होत असल्याचा आरोप करून मविआ सरकारच्या काळात खळबळ उडवून दिली होती.
शंभर कोटींच्या लेटर बाँम्बने उडाली होती खळबळ
मार्च 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना परमबीर सिंह यांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांनी यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलीस अधिकार्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता, असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटकाही झाली.






सहा महिने अज्ञातवासात
खंडणीच्या गुन्ह्यांत फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सुमारे सहा महिन्यांच्या अज्ञातवासानंतर अखेर मुंबईत पोलिसांपुढे शरण आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सिंह यांना 6 डिसेंबपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. अटकेपासून तात्पुरते संरक्षण मिळाल्यानंतर सिंह यांनी आपण चंदिगडमध्येच असल्याचे स्पष्ट केले होते.
अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट
अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या अटकेनंतर पुन्हा प्रकाशझोतात आले होते. त्यापाठोपाठ त्यांनी मुंबईचे सीपी असताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चक्क माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. परमबीर यांनी एटीएसमध्ये डेप्युटी आयजी पदही भूषवले आहे. सिंह यांचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला आहे. ते चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकही राहिले आहेत.







