दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधील चिमुकल्यांचे तस्करी प्रकरण : पथक आज तपासार्थ बिहारात जाणार !
Smuggling case of toddlers in Danapur-Pune Express : The team will go to Bihar for investigation today! भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी भुसावळात 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावर 30 बालकांची बुधवारी सुटका केली होती. अटकेतील पाच संशयितांनी सांगलीतील मदरसा येथे शिक्षण घेण्यासाठी अल्पवयीनांना नेत असल्याची माहिती दिली असलीतरी प्रत्यक्षात मुलांच्या पालकाचे कुठलेही संमतीपत्र नसल्याने भादंवि 370 अन्वये ह्यूमन ट्रॅफिकींगच्या कलमलावून गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोहमार्ग पोलिसांचे पथक आता शुक्रवारी बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात बालकांच्या पालकांची भेट घेवून या प्रकाराविषयी चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांनी दिली.
बालहक्क आयोगाकडून कारवाईची दखल
महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाचे सदस्य तसेच जळगाव बालकल्याण समितीने पोलिसांच्या तस्करीबाबतच्या कारवाईची दखल घेतली. गुरुवारी या समितीच्या दोन सदस्यांसह अन्य चौघांनी पोलीस निरीक्षक घेर्डे यांची भेट घेत घडलेला प्रकार जाणून घेतला तसेच अटकेतील मौलाना मोहंमद आतझर आलम (34, रा.डुंबा, जौकीया, बिहार) याचीदेखील अधिकार्यांमार्फत सविस्तर माहिती जाणून घेतली.




आज पथक बिहार राज्यात जाणार
रेल्वेतून सुटका करण्यात आलेले सर्व 29 मुले अल्पवयीन असून सध्या त्यांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. एकाच महिन्यातील अनेकांच्या जन्मतारखा असल्याचे आधारकार्डवर स्पष्ट झाले आहे. यंत्रणेला अनेक बाबींचा तपास करावयाचा असल्याने शुक्रवारी सहाय्यक निरीक्षकासह अन्य दोघे कर्मचारी बिहार राज्यात तपासार्थ जाणार आहेत. सुटका करण्यात आलेल्या पालकांसोबत पथक चर्चा करणार असून खरोखर पालकांच्या परवानगीनेच या मुलांना शिक्षणासाठी पाठवण्यात आले की आणखी काही कारणाने वा आमिष दाखवून मुले मौलानासोबत निघाली याची चौकशी पथकामार्फत केली जाणार आहे.
‘तो’ पर्यंत मुले जळगावातच
एका वकिलाच्या ट्वीटनंतर रेल्वे सुरक्षा यंत्रणांनी भुसावळसह मनमाडमध्ये 59 बालकांची सुटका केली. भुसावळातील चिमुकले सध्या जळगाव बालनिरीक्षणगृहात तर मनमाडमधील मुले नाशिक येथील बाल निरीक्षणगृहात आहेत. मुले घाबरलेल्या अवस्थेत असून त्यांना धड नेमके कुठून कुठे नेले जात होते? कशासाठी नेले जात होते? हेदेखील सांगता आलेले नाही. चिमुकल्यांच्या पालकांची चौकशी केल्यानंतरच चिमुकल्यांचा ताबा पालकांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.