दानापूर एक्स्प्रेसमधून तस्करीच्या संशयातून ताब्यात घेतलेले 29 चिमुकले अखेर बिहारात रवाना
बिहारातील जिल्हा बालकल्याण समितीकडे चिमुकल्यांचा ताबा : अन चिमुकल्यांचे चेहरे फुलले
29 children detained on suspicion of smuggling from Danapur Express finally left for Bihar भुसावळ : दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून तस्करीच्या संशयातून भुसावळात 29 तर मनमाडला 30 चिमुकल्यांची सुटका करून त्यांची रवानगी बालनिरीक्षण गृहात करण्यात आली. तब्बल 14 दिवस चिमुकले बालनिरीक्षण गृहात राहिल्यानंतर अनेक संघटनांनी आवाज उचलला तर जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनीही जिल्हाधिकार्यांची भेट घेत चिमुकल्यांची सुटका करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जळगावातील 29 बालकांचा बिहारमधील व पुरनिया व अरराई जिल्हा बालकल्याण समितीकडे ताबा देण्याबाबत आदेश दिल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चिमुकले पोलीस बंदोबस्तात बिहारकडे एलटीटी-भागलपूर एक्स्प्रेसने रवाना झाली. गेल्या 14 दिवसांपासून पालकांच्या भेटीने आतुर झालेल्या चिमुकल्यांचे चेहरे यावेळी आनंदाने फुलल्याचे दिसून आले.
असे आहे नेमके प्रकरण
01040 दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून अल्पवयीन मुलांची तस्करी होत असल्याची तक्रार आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी भुसावळात 29 मुलांची सुटका केली होती तर मनमाडमध्ये 30 मुलांची सुटका केली. या प्रकरणी भुसावळात मौलाना मोहम्मद अंजुर आलम मोहम्मद सैय्यद अली (44, डूबा, जोकिहार, अररीया, बिहार) याच्याविरोधात मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली तर मनमाडमध्येही चौघांना अटक करण्यात आली. संशयितांनी आम्ही मदरशातील मौलाना असल्याचे यंत्रणेला सांगत चिमुकल्यांना सांगलीतील मदरशात नेत असल्याचे सांगितले मात्र कागदोपत्री पुरावे नसल्याने त्यांना मानवी तस्करीचा कलम लावून अटक करण्यात आली. रेल्वेतून भुसावळात उतरवलेल्या चिमुकल्यांना बालनिरीक्षण गृहात हलवण्यात आल्यानंतर पालकांनी भुसावळ येवून मुलांचा ताबा देण्याची मागणी करीत मुलांना संमतीने मदरसात पाठवल्याचे यंत्रणेला लिहून दिले होते मात्र कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर चिमुकले मंगळवारी बिहारला रवाना झाले.




चिमुकल्यांचा राखीव कोचने प्रवास
जळगाव बालनिरीक्षण गृहातून चिमुकल्यांना दोन खाजगी टेम्पोतून भुसावळ रेल्वे स्थानकावर मणियार बिरादरीच्या माध्यमाने व ट्रेंड इंजिनिअरिंगचे साजीद शेख यांच्या सहकार्याने आणण्यात आल्यानंतर त्यांचे भुसावळ स्थानकावर गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. शासनातर्फे भुसावळ ते भागलपूर रेल्वेत राखीव डबा उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चिमुकले बिहारकडे रवाना झाले.
यांची स्थानकावर उपस्थिती
या बालकांना निरोप देण्यासाठी जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख, जिल्हा अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मझहर पठाण, शिकलगार फाउंडेशनचे अध्यक्ष अनवर खान, ईदगाह ट्रस्टचे सचिव अनिस शहा, हुसैनि सेनाचे अध्यक्ष फिरोज शेख, भुसावळचे इम्तियाज शेख, नदीम बागवान, साजीद शेख, टीसी अकील शेख, नवीद शेख, लोहमार्गचे पोलीस उपस्थित होते.