Sharad Pawar जे मंत्री झाले, त्यांच्यावर ईडीचे गुन्हे, त्यांचा चेहराच सर्व काही सांगतो : शरद पवार


Those who became ministers, ED crimes against them, their face tells everything :  Sharad Pawar मुंबई : आज जे मंत्री झाले आहेत त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल आहेत, त्यांचा चेहरा सर्व काही सांगतो, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांवर टिका केली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. पवार म्हणाले की, मला आनंद आहे, आज त्यांनी राष्ट्रवादीच्या सहकार्‍यांनाच शपथ दिली. म्हणजे मोदींनी केलेले आरोप हे वास्तव नव्हते. या आरोपातून या सर्वांना मुक्त केले, या बद्दल पंतप्रधानांचा आभारी असल्याचा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.

राजकीय भूकंपाने देशात खळबळ
राज्यातील सर्वात मोठा राजकीय भूकंप रविवारी देशाने झालेला पाहिला. पुतण्यानेच काकाला धोबीपछाड देत शिंदे-भाजपा सरकारसोबत हात मिळवणी केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 6 जुलै रोजी पक्षाची बैठक बोलावली होती, मात्र त्याआधी काही सहकार्‍यांनी वेगळी भूमिका घेतली. किती लोकांनी वेगळी भूमिका घेतली, हे लवकरच समोर येईल. आजचा हा प्रकार माझ्यासाठी नवा नाही, 1980 मध्ये मला अनेक जण सोडून गेले होते, तेव्हा मी पक्ष पुन्हा बांधला. त्यामुळे हा प्रकार माझ्यासाठी नवीन नाही. त्यावेळी ज्यांनी पक्षाला सोडलं, त्यापैकी 3 ते 4 जण सोडले तर सर्वजण पराभूत झाले. माझा राज्यातील जनतेवर पूर्ण विश्वास आहे, असंही पवार म्हणाले.





न्यायालयात नव्हे तर लोकांमध्ये जाणार
अजित पवारांनी पक्षावर दावा केला आहे. या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, जे घडलं त्याची मला चिंता नाही. पक्षावर दावा केला तर मी लोकांमध्ये जाणार. मी न्यायालयात जाणार नाही, जनता योग्य तो निर्णय घेईल. जे गेले, त्यांच्या भविष्याची चिंता मला आहे. या गोष्टीचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते. मोदींनी वक्तव्य केल्यामुळे आमचे काही नेते अस्वस्थ होते. काहींच्या मागे ईडी लावलेली होती, त्यामुळेच त्यांची अस्वस्थता वाढली आणि आजचा प्रकार घडला.

कारवाई करणार
पक्षाच्या विरोधात काम करणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे शरद पवार म्हणाले. मी अजून कोणाशीही बोललेलो नाही. अजित पवार यांच्याशीही बोललो नाही. आपण आजही पक्षाचे अध्यक्ष आहोत. बंडखोर नेत्यांबाबत शरद पवार म्हणाले की, त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे सरचिटणीस केले होते, मात्र त्यांनी फसवणूक केली, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

उद्या कराडला जाणार
महाराष्ट्रात फिरून जनतेचा पाठिंबा घेणार आहे. मी पक्ष काढला हे लोकांना माहित आहे. मोदीजी जे करत आहेत ते लोकांना आवडत नाही. अजित पवारांना जनता उत्तर देईल. उद्याच मी कराडला जाणार आहे. तेथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाराष्ट्र दौर्‍याची सुरुवात करणार आहे. यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे गुरु आहेत. आणि उद्या गुरुपौर्णिमा आहे. उद्यापासूनच पक्षासाठी झंझावाती दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !