भुसावळात ‘वन नेशन वन कार्ड’ वितरणाचा शुभारंभ

देशभरात लाभार्थीला कुठेही घेता येईल धान्याचा लाभ : अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन


Distribution of ‘One Nation One Card’ started in Bhusawal भुसावळ : ‘एक देश एक शिधापत्रिका’या संकल्पनेत भुसावळ शहरासह तालुक्यातील सर्वच रेशनकार्डधारकांना आता भाविष्यात ई- रेशनकार्ड मिळणार असून त्याचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण सुरू करण्यात आल्याचे जळगाव अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी येथे सांगितले. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी ‘वन नेशन वन कार्ड’ वितरणाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते झाला. प्रसंगी महाजन बोलत होते. प्रसंगी त्यांच्याहस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विधवा, अपंग व आदिवासी 30 लाभार्थींना ई रेशनकार्ड देण्यात आले. महाजन म्हणाले की, भुसावळ तालुक्यातील 47 हजार कार्डाचे रूपांतर ई-रेशनकार्डात होणार असून वंचितांना सुविधा मिळणार असून देशभरात आता लाभार्थींना कुठेही धान्याचा लाभ या कार्डाच्या माध्यमातून घेता येईल. यावेळी प्राधान्य कुटूंब योजनेसह अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले तर राष्ट्रीय अर्थसहाय्य योजना पुरस्कृत 11 विधवा महिलांना प्रत्येकी 20 हजार रुपये लाभाचे प्रमाणपत्र तसेच विविध दाखल्यांचे वाटप प्रसंगी करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, भुसावळ तहसीलदार निता लबडे, निवासी नायब तहसीलदार शोभा घुले, निवडणूक नायब तहसीलदार अंगद आसटकर, भगवान शिरसाठ आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी म्हणाले की, कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या कुटुंबांना रेशनच्या धान्यासाठी गावी परतावे लागत होते मात्र यापुढे त्यांना ई कार्डच्या माध्यमातून देशभरात कुठूनही धान्य घेता येईल. महसूल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात असून एक हात मदतीचा उप्रकम अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, विशेष अर्थ सहाय्य योजना यात लाभार्थीना लाभ मिळवून देण्यात आला. शासनाने नागरीकांसाठी सुरू केलेल्या योजना या नागरीकांपर्यत पुरविल्या जाणार आहे.





नवीन रेशनकार्डधारकांना मिळणार ई रेशनकार्ड : तहसीलदार
भुसावळ तहसीलदार निता लबडे म्हणाले की, पदभार घेतल्यानंतर आतापर्यंत सुमारे 700 प्रलंबित अर्जांचा निपटारा केला आहे. यात नवीन रेशनकार्ड, दुय्यम कार्ड, नाव कमी करणे, नाव वाढविणे आदी दाखल झालेले अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.ई-रेशनकार्डधारक हे कुठल्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतील. ई पॉस मशीनवर कार्डधारकांनी त्यांचा अंगठा ठेवल्यावर त्यांचे नाव, रेशनकार्ड नंबर येतो. ग्राहकाकडे रेशनकार्ड नसलेतरी त्यांनी दुकानदारांना आधारकार्डचा नंबर सांगितला तरी सुध्दा त्यांना धान्य मिळेल शिवाय ग्राहक बाहेरगावी असले तरी त्यांना गावात येण्याची गरज नाही त्यांना ज्या गावात आहेत तेथील रेशन दुकानातून धान्य मिळेल. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील म्हणाले की, तहसील कार्यालयात आता जे लाभार्थी नवीन रेशनकार्ड काढतील त्यांना ई रेशनकार्ड देण्यात येईल तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थींना लाभ देण्यात येईल. सूत्रसंचालन भाऊसाहेब शिरसाठ यांनी तर नायब तहसीलदार अंगद आसटकर यांनी आभार मानले.

तहसील कार्यालयात हिरकरणी कक्षाचे उद्घाटन
अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते भुसावळ तहसील कार्यालयात हिरकणी कक्ष आणि लायब्ररीचे उद्घाटन करण्यात आले. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाचा लाभ होणार आहे. तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांसाठी कायद्याची माहिती अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !