यावलला उपोषणार्थीच्या समर्थनार्थ पाच तास रास्ता रोको

ऐतिहासीक आंदोलन : स्पेशल ऑडिटसह ग्रामसेविकेच्या विभागीय चौकशीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे


Stop the road for five hours in support of Yavala hunger strikers यावल : यावल तालुक्यातील सावखेडासिम ग्रामपंचायतीत झालेल्या अपहार संदर्भात यावल पंचायत समिती समोरील उपोषण आठव्या दिवशी मागे घेण्यात आले. दरम्यान उपोषणकर्त्यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीकडून तब्बल पावणे पाच तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शहरात आल्यावर त्यांनी स्पेशल ऑडीटसह ग्रामसेविकाची विभागीय चौकशीचे आदेश दिल्या नंतर उपोषण व आंदोलन मागे घेण्यात आले.

सर्वाधिक वेळ चालले यावलला आंदोलन
यावलच्या इतिहासात अनेक आंदोलने झाले, रस्ता रोकोही झाला मात्र आजच्या आंदोलनाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. सुमारे पावणेपाच तास रास्ता रोको झाल्याने भुसावळसह फैजपूर व चोपडा रस्त्यावरील तीन्ही बाजुने पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतराने वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. या आंदोलनामुळे शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. यावल पंचायत समितीसमोर पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर सोपान पाटील यांच्या नेतृत्वात सोमवार, 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण छेडण्यात आले. गुरूवार, 17 ऑगस्ट रोजी उपोषणकर्त्यांना समर्थन देत काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. नंतर शुक्रवारी, 18 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीकडून भुसावळ टी-पॉईंटवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले तसेच उपोषणकर्त्यांची दखल घेत जिल्हा परीषदेकडून गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली.

दोषींवर कारवाईसाठी उपोषणार्थी ठाम
शनिवार, 19 रोजी आमदार शिरिष चौधरी, जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे यांनी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट घेवून उपोषणकर्त्यांच्या संदर्भात माहिती दिली मात्र जोपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उपोषण कायम राहिल, असा पावित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला व सोमवारी पुन्हा महाविकास आघाडीसह निळे निशाण सामाजिक संघटनेच्या सहभागाने अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर भुसावळ टी-पॉईंटवर रास्तारोको आंदोलनाला सोमवारी सकाळी 11.45 पासून सुरवात करण्यात आली. जोपर्यंत जिल्हा परीषदेचे अधिकारी येत नाही तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्णय आंदोलकांनी घेतला. जिल्हा परीषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील हे शहरात 3.30 वाजेला दाखल झाले व त्यांनी उपोषणकर्त्यांना ग्रामपंचायतीच्या अपहार प्रकरणी स्पेशल ऑडीट करण्यात येईल व यात अपहार सिध्द झाल्यावर संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच ग्रामसेवकांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्याचे लेखी आश्वासन त्यांनी दिले व सकाळी 11.45 पासून सुरू झालेले रास्तारोको आंदोलन सायंकाळी 4.25 वाजेच्या सुमारास मागे घेण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात जिल्हा परीषदेचे माजी गटनेता प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा माजी प्राचार्य प्रा.जी.पी.पाटील, माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रसेचे शहराध्यक्ष कदीर खान, सेना उबाठा तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, पप्पू जोशी, संतोष खर्चे, डॉ.विवेक अडकमोल, राष्ट्रवादीचे एम.बी.तडवी, शेतकी संघाचे चेअरमन अमोल भिरूड, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील, सुकदेव बोदडे, कामराज घारू, आबीद कच्छी, राजेश पाटील, हाजी गफ्फार शाह, विक्की गजरे, सुनील भालेराव, इम्रान पहेलवान, शेख नईम, राजेश करांडे, उमेश जावळे, विक्की पाटील, पवन पाटील, शरद पाटील, उस्मान तडवी, अमर कोळी, राजू महाजन, अलताफ तडवी, निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, लक्ष्मी मेढे, विलास तायडे, बापू जासुद सह मोठ्या संख्येत पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला यांनी रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले.

आमदारांनी सोडवले उपोषण
पंचायत समितीच्या आवारात शेखर पाटीलसह रहेमान रमजान तडवी व सलीम मुसा तडवी या तिघा उपोषणकर्त्यांशी आमदार शिरीष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, एनएसयुआयचे राज्य सरचिटणीस धनंजय चौधरी यांच्याशी चर्चा करून लेखी आश्वासानानंतर उपोषण मागे घेण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !