भुसावळातील गुटख्याची तस्करी प्रकरण : आरोपी चालकाला 24 पर्यंत कोठडी

Gutkha smuggling case in Bhusawal : Accused driver jailed up to 24 भुसावळ : इंदूरहून भुसावळकडे निघालेल्या कंटेनरमधून पोलिसांनी सुमारे 47 लाखांचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा रविवारी रात्री शहरातील जामनेर रोडवरील प्रीमीयर हॉटेलजवळ जप्त केला होता. अन्न व सुरक्षा विभागाला पत्र देवूनही संबंधित विभागाने पाठ फिरवल्यानंतर पोलीस प्रशासनानेच याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कंटेनर चालक जगदीश मांगीलाल श्रीवास्तव (48, रा.790, कुंदन नगर, हवा बंगला, केट रोड, इंदूर) यास अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसांची अर्थात 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मूळ मालकाला शोधण्याचे यंत्रणेपुढे आव्हान
मूळात कंटेनर चालक जगदीश मांगीलाल श्रीवास्तव यास फोनवरून इंदूरहून भुसावळपर्यंत कंटेनर नेण्याच्या सूचना करण्यात येत होत्या त्यामुळे गुटख्याची कुठून कुठपर्यंत तस्करी होणार होती? याचा तपास करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे शिवाय गुटखा तस्करीतील बड्या माश्यांना शोधून त्यांना अटक करण्याचे आव्हानही यंत्रणेपुढे आहे. मध्यप्रदेशात गुटखा विक्रीवर बंदी नसल्याने सहज तेथे मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री होवून चोरट्या मार्गाने तो महाराष्ट्रात पोहोचवला जातो अर्थात या प्रकाराला पोलीस प्रशासन व अन्न-सुरक्षा विभागाचे खतपाणी असल्याने अपवादात्मकरीत्या कारवाई होताना दिसते. बाजारपेठ पोलिसांनी धाडसाने कारवाई केल्यानंतर आता मुळ पुरवठादार, खरेदीदार व या प्रकारात गुंतलेल्या बड्या दलालांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेपुढे उभे राहिले आहे.
मोबाईल कॉल्सवरून होणार उलगडा
अटकेतील कंटेनर चालक जगदीश श्रीवास्तव याच्या म्हणण्युनसार त्यास केवळ फोनवरून सूचना मिळाल्याने तो भुसावळपर्यंत आला व येथून त्याला पुढे कुठे कंटेनर न्यायचा याची सूचना मिळणार होती त्यामुळे कंटेनर चालकाच्या मोबाईलवर आलेल्या कॉल्सचा अभ्यास करून मूळ आरोपींना शोधून त्यांना अटक करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे असणार आहे. 46 लाख 92 हजार 480 रुपयांच्या प्रतिबिंधीत गुटख्याची तस्करी केल्याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रशांत नीळकंठ सोनार यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कंटेनर चालकाला मंगळवारी सत्र न्यायालयाने 24 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव व सहकारी करीत आहेत.




