चांदोमामाशी होणार आज गळाभेट ः अंतराळ संशोधनात आजचा दिवस महत्त्वपूर्ण ; देशभरात प्रार्थना


नवी दिल्ली : चंद्राच्या दिशेनं झेपावलेलं भारताचं चंद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत फिरत असून आज बुधवारी या यानामधील विक्रम लँडर हा चंद्राच्या पृष्टभागावर उतरणार आहे. विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरणारा भारत हा पहिला देश ठरेल. दरम्यान, चांदोमामाशी होणारी गळाभेट पाहण्यासाठी देशाच्या नजरा खिळल्या आहेत तर अंतराळ संशोधनाच्या इतिहासामध्ये भारतासाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरला आहे. नियोजित वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल.

इस्रोचा प्लॅन बी तयार
चंद्रयान-3 मधील सर्व यंत्रणा व्यवस्थित सुरू असल्याबद्दल इस्रोकडून वारंवार तपासणी केली जात आहे. या यंत्रणा तसेच चंद्रावरील वातावरण या सर्व गोष्टींमध्ये अपेक्षेपेक्षा काही वेगळे बदल जाणवले तर इस्रोने चंद्रयान-3चे लँडिंग 23 ऑगस्टऐवजी 27 ऑगस्टला करण्याचा पर्यायही ठेवला आहे. यान चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतरही हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे इस्रोने म्हटले आहे.

लँडिंगनंतर काय होणार?
चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडर उतरल्यानंतर तो अधिक सक्रिय होईल. त्याचे रॅम्प उघडून त्यातून प्रग्यान रोव्हर चंद्रावर उतरेल. त्यानंतर विक्रम लँडर व प्रग्यान रोव्हर परस्परांची छायाचित्रे टिपणार असून ती पृथ्वीवर पाठवतील.

लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यामधून प्रज्ञान हा सहा पायांचा रोव्हर बाहेर येईल. त्याल इस्त्रोकडून कमांड मिळताच तो चंद्राच्या पृष्टभागावर चालेल. तो 500 मीटरपर्यंत जाऊन पाणी आणि तेथील वातावरणाबाबतची माहिती इस्रोला देईल. यादरम्यान प्रज्ञान त्याच्या चाकांवर लावलेले अशोक स्तंभ आणि इस्रोच्या चिन्हाची छापही चंद्रावर सोडेल.

इस्रोने चांद्रयान-3 मोहिमेसंदर्भात आपल्या कमांड सेंटरची दोन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यापूर्वी प्रत्येक पॅरामीटरवर लक्ष दिले जात आहे. इस्रोने माहिती दिली की लँडर मॉड्यूल लँडिंगची प्रक्रिया सायंकाळी 5.44 वाजता सुरू होईल. केंद्राकडून कमांड मिळाल्यानंतर लँडर मॉड्यूल त्याचे इंजिन सुरू करेल आणि मिशन ऑपरेशन्स टीम त्याला सतत कमांड पाठवेल. या संपूर्ण प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी 5.20 पासून सुरू होईल.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !