नाशिक पुन्हा खुनाने हादरले : भाजी विक्रेत्याची निर्घृण हत्या

Nashik again rocked by murder : Brutal killing of vegetable seller नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्याच हद्दीत एका भाजीविक्रेत्याची भर दिवसा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सापासप वार करीत हत्या केली. गुरुवारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने सिडकोमध्ये हा हल्ला झाला. संदीप आठवले (22, रा.लेखानगर) असे मयताचे नाव आहे. या खुनी हल्ल्याचा थरार येथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमध्ये कैद झाला आहे.
हल्ल्याचे कारण अस्पष्ट
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने सिडको शॉपिंग सेंटर चौकात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते सहा हल्लेखोरांनी भाजीविक्रेता संदीप आठवले (22, रा.लेखानगर) या युवकावर प्राणघातक हल्ला केला. गंभीरपणे जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने बघून दुचाकीस्वार हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह तात्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. यावेळी परीसरात भीतीचे वातावरण पसरले.पोलिसांनी त्वरीत बंदोबस्त याठिकाणी वाढविला.




