भुसावळ शहरातील कुविख्यात गुन्हेगार आतीश रवींद्र खरात स्थानबद्ध

Notorious criminal Atish Ravindra Kharat arrested in Bhusawal city भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या उपद्रवींविरोधात भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात शहर, बाजारपेठ व तालुका पोलीस प्रभारींनी हद्दपारीसह एमपीडीएच्या कारवाईचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केल्यानंतर उपद्रवींविरोधात धडक कारवाईचा सपाटा सुरू असताना अट्टल गुन्हेगार आतीश रवींद्र खरात (27, समतानगर, भुसावळ) याच्याविरोधात एमपीडीए करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच काढल्यानंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली असून संशयिताची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आल्यानंतर शहरातील गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी काही दिवसात आणखी काही उपद्रवींवर मोठी कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत.
संशयिताविरोधात सात गुन्हे दाखल
संशयित आतीश खरात विरोधात अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणे, अत्यावश्यक लागणार्या वस्तूंचा काळा बाजार, बेकायदेशीर हत्यार घेवून परीसरात दहशत माजविणे, गावठी दारूची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तीन तर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार असे सात वेगवेगळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. भुसावळ शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांनी धोकादायक व्यक्ती या संज्ञेचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करून एमपीडीए कायद्यांगर्तत गुन्हेगार अतिष खरात याला एक वर्षासाठी पुण्यातील येरवडा कारागृहात स्थानबध्द करण्याच्या आदेशाला 31 जुलै रोजी मंजुरी दिली होती मात्र संशयित गवसत नसल्याने त्याचा शोध सुरू असताना संशयिताला 24 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे व पोलीस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, निलेश गायकवाड, अनिल चौधरी, संजय पाटील, संदेश निकम, सोपान पाटील, भूषण चौधरी, दीपक शेवरे, योगेश घुगे यांनी संशयिताला अटक करीत येरवडा कारागृहात स्थानबध्द केले. दरम्यान, एमपीडीए प्रस्तावाकामी पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा निरीक्षक किसनराव नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, हवालदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील आदींच्या पथकाने सहकार्य केले.




