नागपूर शहर पाण्याखाली ; आतापर्यंत तिघांचा मृत्यू ; वाहने वाहिली
नागपूर : मुसळधार पावसामुळे नागपूरात हाहाःकार उडाला आहे. अनेक गुरे पुराच्या पाण्यात वाहिली असून अनेक नागरीकांकडील वाहनेदेखील वाहिल्याने प्रचंड नुकसान झाले आहे तर आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या पावसानंतर शहरात त्रेधातिरपीट उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्या दुकानदारांचे नुकसान झाले त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत तर छोट्या ठेल्यांना 10 हजारांची मदत केली जाईल व नवीन पूलही बांधण्यात येतील.
दहा हजारांवर घरांमध्ये शिरले पाणी
फडणवीस यांच्या माहितीनुसार, दोघांचा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा एक मृतदेह आढळला तर दहा हजार नागरीकांच्या घरात पाणी शिरले व काही नागरीकांचे स्थलांतर करावे लागले. नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याने तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये देणार आहोत. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.




देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नुकतीच आढावा बैठक झाली. यावेळी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते. अतिशय कमी वेळात 109 मिमी पाऊस पडला. 90 टक्के पाऊस दोन तासात पडला त्यामुळे अंबाझरी ओव्हरफ्लो झाल्याने नाग नदी, पिवळी नदीत पूरस्थिती निर्माण झाली.