राज्यात कोळश्याची टंचाई : महानिर्मितीच्या सातही वीजनिर्मिती केंद्रांकडे केवळ चार दिवसांचा साठा

सव्वालाख मेट्रीक टन कोळशाची तूट : वीज निर्मितीवर परीणामाची भीती


Coal shortage in the state : All the seven power generating stations of Mahanirti have only four days’ supply भुसावळ : पावसामुळे कोळसा खाणीतून निघणार्‍या कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने आता महानिर्मितीच्या राज्यभरातील सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये 14 दिवस पुरेल इतका कोळसासाठा शिल्लक असणे अनिवार्य आहे मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. दररोज मिळणार्‍या कोळशातून गरज भागवली जात आहे. महानिर्मितीमध्ये सरासरी सव्वालाख टन कोळशाची तुट असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राज्यात विजेची मागणी
राज्यातील गणेशोत्सव व आगामी काळातील सण उत्सवांमुळे दिवाळीपर्यंत वीजेची मागणी कायम राहणार आहे. पूर्ण क्षमतेने अर्थात साडेसात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करायची असल्यास किमान रोज 67 हजार 500 टन कोळशाची गरज भासते. त्यानुसार सध्या जवळपास सव्वा लाख टनांची तूट आहे मात्र कोळसा खाणींमधून दररोज कमी प्रमाणात का असेना कोळसा उपलब्ध होत असल्याने वीजनिर्मिती सुरू आहे. कोणतेही केंद्र कोळशाअभावी बंद झाले नाही. मात्र हीच स्थिती कायम राहिल्यास 100 टक्के क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास अडचणी येतील. सद्यस्थितीत कंपनीच्या विविध औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा आहे. महानिर्मिती कंपनीची औष्णिक वीज निर्मिती क्षमता 9 हजार मेगावॉटच्या घरात आहे. मात्र प्रत्यक्षात सहा ते सात हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होते. त्यातही कोळसा टंचाई निर्माण झाल्यास वीजेची निर्मिती 5 हजार मेगावॅटपर्यंत घसरण्याची भिती आहे.



सहा लाख 70 हजार टन कोळसासाठा
सध्या उत्सवामुळे राज्याची मागणी 22 हजार मेगावॅटहून अधिक झाली आहे. त्यामुळे महावितरण कंपनी अधिकाधिक वीज महानिर्मितीकडून खरेदी करण्याच्या तयारीत आहे. महानिर्मितीच्या राज्यभरातील सात औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांत सध्या 6 लाख 70 हजार टन कोळसा साठा आहे. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या नियमानुसार वीज केंद्रामध्ये कमीत कमी 15 दिवसांचा साठा असायला हवा. मात्र हा साठा केवळ चार दिवस पुरेल इतकाच आहे.

तर पुन्हा आपत्कालीन भारनियमन?
राज्यातील महानिर्मितीच्या सातही औष्णिक केंद्रातून कोळशाअभावी वीजनिर्मिती घसरली तर राज्यात पून्हा काही वितरण ग्रुपवर वीजभारनियमन होण्याची भिती आहे. आगामी काळात सण उत्सवांच्या पार्श्वभुमीवर राज्याची वीज मागणी सरासरी दीड हजार ते 1700 मेगावॅटने वाढू शकते. अशा वेळी निर्मितीही वाढविणे अपेक्षीत आहे. मात्र कोळशाअभावी ती वाढली नाही तर राज्याला पून्हा आपत्कालीन भारनियमनाचा फटका बसेल.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !