येरवडा पोलिस ठाण्याची जमीन न दिल्याने सीआयडीचे पद मिळाले नाही : मीरा बोरवणकरांचा आरोप
Did not get post of CID due to non-grant of Yerwada police station land : Meera Borwankar’s allegation नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे राज्यात चर्चेत आल्या आहेत. सोमवारी त्यांनी पुन्हा धक्कादायक आरोप करीत खळबळ उडवून दिली आहे. त्या म्हणाल्या की, येरवडा पोलिस ठाण्याची जमीन देण्यास ठाम नकार दिल्याने आपल्याला पुण्यात अपर महासंचालक सीआयडीचे पद रीक्त असतानाही देण्यात आले नाही कारण सीआयडीमध्ये बिल्डरांशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी प्रलंबित होती. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत नसून आघाडीचा धर्म पाळावा लागेल, असे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते पण पुण्यातच नियुक्ती हवी असल्यामुळे कारागृह विभागातील नियुक्ती स्वीकारली, असे बोरवणकर म्हणाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
राज्यातील बिल्डर, नोकरशहांचे पोलिसांशी लागेबांधे
सोमवारी माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी सांगितले की महाराष्ट्रात शासनाच्या भूखंडांवर नजर असलेल्या बिल्डर्सचे राजकीय नेते, नोकरशहा आणि पोलिसांशी भयंकर लागेबांधे आहेत.




येरवड्यातील जमीन ज्या बिल्डरला ‘प्रक्रिये’नुसार देण्यात आली होती. त्याच्या आजूबाजूचे दोन्ही भूखंड संबंधित बिल्डरचेच होते, असा दावा त्यांनी केला. राज्यात अनेक ठिकाणी ‘येरवडा’ पॅटर्नने सरकारी भूखंड हडपण्याचे प्रकार सुरू आहेत.
पुस्तकातील खुलाशानंतर अनेक अधिकारी, माजी न्यायमूर्तींचे मोठ्या प्रमाणावर फोन येत आहेत. कोर्टामुळे औरंगाबादमधील 50 एकरचा भूखंड बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला, असे त्या म्हणाल्या. आपला राजकारणाशी संबंध नाही. त्यामुळे या खुलाशामुळे पुढे काय होईल हे सांगू शकत नाही. जिथे जिथे खासगी बिल्डर्सना सरकारी जमिनी दिल्या आहेत, त्यांचा फेरआढावा घेण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.