ड्रग्स माफिया ललित पाटीलला चेन्नईत पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; संशयित म्हणाला मला तर पळवले…!
मुंबई (वृत्तसंस्था) : मी रुग्णालयातून पळालेलो नसून मला पळवण्यात आले असून मी बाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा चेन्नईत अटक करण्यात आलेल्या ड्रग माफिया ललित पाटील याने केला आहे. ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेला ड्रग माफिया ललित पाटीलला चेन्नईत पकडल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. अंधेरी न्यायालयात हजर करण्यासाठी संशयिताला साकीनाका पोलिस स्थानकातून वैद्यकीय तपासणीसाठी जात असताना जेरबंद ललित पाटील ‘माझा’च्या कॅमेर्यात कैद झाला असता त्याने मी पत्रकारांशी लवकरच बोलेल, मला पळवण्यात आले आहे, असा दावाही त्याने केला.
धक्कादायक दाव्याने खळबळ
ड्रग माफिया ललित पाटील याला पोलिसांनी वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने धक्कादायक दावा केला. मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नव्हतो, तर मला पळवण्यात आलं होतं. यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आह.




चेन्नईत आवळल्या मुसक्या
ड्रग माफिया ललित पाटील पसार झाल्यानंतर त्याला चेन्नई येथून अट करण्यात आली. ललित पाटील हा श्रीलंकेमध्ये पळण्याच्या तयारीत होता, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर ललित पाटील याला मुंबईत आणण्यात आले आहे. तसेच रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
महाराष्ट्रातही केला प्रवास
पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटील हा नाशिकला गेला व तेथून इंदूरला व तेथून गुजरातला गेला. त्याठिकाणाहून त्याने टूर्स आणि ट्रॅव्हल्स गाडी भाड्याने घेतली. त्या गाडीने तो कर्नाटकात गेला. यादरम्यान, त्याने महाराष्ट्रातून प्रवास केला. त्यानंतर तो चेन्नईला पोहोचल्याचे सांगण्यात आले. ललित पाटीलच्या एका निकटवर्तीयाला अटक करण्यात आली व अटकेतील आरोपीलाच ललित पाटीलचा फोन आल्यानंतर त्याला चेन्नईतून बेड्या ठोकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.