छत्रपती संभाजी नगरात डीआरआरची मोठी कारवाई : 500 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त
Big operation of DRR in Chhatrapati Sambhaji Nagar : 500 crore drug stock seized छत्रपती संभाजी नगर : अहमदाबाद शहरातील गुन्हे शाखेसह महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी.आर.आय पथकाने छत्रपती संभाजी नगरात 25 दिवसांच्या पाळतीनंतर मोठी कारवाई करीत सुमारे 500 कोटींचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. रसायन कारखान्याच्या नावाखाली कोकेन, केटामाइन आणि मेफेड्रोन (एमडी) यासारख्या ड्रग निर्मितीचे उद्योग पैठण आणि वाळूज औद्योगिक वसाहतीत सुरू असताना स्थानिक यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रविवारी सकाळी कारवाई
सूत्रधार जितेशकुमार प्रेमजीभाई हिनहोरिया (मूळ रहिवासी गुजरात, ह.मु. कांचनवाडी 45) यांच्या अत्यंत आलिशान बंगल्यावर छापे मारले. यात एकूण 500 कोटी रुपयांचे ड्रग्ज व रसायने जप्त केले. यात 250 कोटींचे कोकेन, केटामाईन, एम.डी.हे अमली पदार्थ आणि अमली पदार्थ निर्मितीसाठी लागणारे 250 कोटी रुपयांचे 23 हजार लिटर रसायन डीआरआयने हस्तगत केले. रविवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही कारवाई झाली.




एकाचा आत्महत्येचा प्रत्न
छत्रपती संभाजीनगर शहरात पथकाने तब्बल 23 किलो कोकेन, 7.4 किलो मेफेड्रोन, 4.3 किलो केटामाईन, आणि 9.3 किलो मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण असा साठा आणि 30 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. पथकाने पकडताच एका आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. जितेश कुमार हिनोरिया प्रेमजीभाई (45, रा.गोलवाडी) आणि संदीप शंकर कुमावत (40, रा. वाळूज) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जितेशकुमार याला पोलिसांनी अटक करून चौकशीसाठी सिडको येथील डीआरआयच्या कार्यालयात नेले. ही चौकशी सुरू असताना जितेशने बाथरूममध्ये जाऊन काचेच्या तुकड्याने आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकार्यांनी त्याला तत्काळ रोखले. या घटनेत त्याच्या गळ्याला गंभीर जखम झाली असून त्यांना सिडकोतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणीदेखील पोलिस पहारा देत आहेत.
गुजरातमधून एका मोबाईल नंबरमुळे रॅकेट उघड
काही दिवसांपूर्वी अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने ‘एमडी’ ड्रग्जसह एकाला पकडले. त्यांनी आरोपीची झाडाझडती घेतली. या आरोपीने दिलेल्या माहितीवरून पोलिस ड्रग्जच्या रॅकेटचा शोध घेत होते. चौकशीदरम्यान पोलिसांना एक फोन नंबर मिळाला. पोलिसांनी तो नंबर तांत्रिक निगराणीखाली ठेवला. सुरतमधील जितेश हिनहोरिया याचा हा फोन नंबर होता. संबंधित क्रमांकावर कोणा-कोणाचे फोन येतात, त्याचबरोबर कोणाला फोन केले जातात, त्यांच्यात काय संभाषण होते ही सर्व माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून हिनहोरिया हा छत्रपती संभाजीनगरमध्ये कारखान्यात ड्रग्जचे उत्पादन करतो व तेथून मुंबई, मध्य प्रदेश, गुजरात येथे पाठवतो हे उघड झाले.
गुजरात पोलिसांची पाळत
अहमदाबाद गुन्हे शाखेचे एक पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्यानंतर वेशांतर करून आरोपीच्या हालचालींवर 20 ते 25 दिवस लक्ष ठेवले. आरोपी कोणाला भेटतो, दिवसभर काय करतो, त्याच्याकडे कोण कोण येते अशी सर्व माहिती या पथकाने संकलित केली. या रेकीनंतर ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याची खात्री त्यांना पटली.