भुसावळात कोळी समाजबांधवांचे अर्धनग्न आंदोलन

प्रांताधिकारी कार्यालयावर निघाला मोर्चा : जळगावच्या आंदोलनास पाठिंबा


Half-naked movement of Koli community members in Bhusawal भुसावळ : कोळी समाजाने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरात कोळी समाजबांधवांनी गांधी पुतळ्यासमोर अर्धनग्न आंदोलन करीत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. साकरी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण कोळी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

जळगावात 19 दिवसांपासून आंदोलन
कोळी समाजाचे गेल्या 19 दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात जाहिर पाठींबा व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोळी समाज बांधवांनी शनिवारी दुपारी एक वाजता भुसावळ येथील गांधी पुतळा जवळ अर्धनग्न अंदोलन केले. भुसावळ तालुक्यातील समाजबांधवांनी प्रांताधिकारी कार्यालयावर अर्धनग्न आक्रोश निषेध मोर्चा काढला. विविध मागण्यांसाठी आंदोलकांनी प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. यावेळी नारायण कोळी, भरत पाटील, महेश सोनवणे, संदीप सोनवणे, खेमचंद कोळी, आकाश सपकाळे, विजय मोरे, गणेश कोळी, सहदेव सपकाळे, दिलीप तायडे, संदीप कोळी, दिलीप कोळी, लिलाधर सूर्यवंशी, धीरज कोळी, विजय कोळी, कैलास सपकाळे, धनराज सपकाळे, नंदू सोनवणे, लोकेश सपकाळे, विकास सपकाळे, महेश कोळी, नामदेव तायडे, जना कोळी, पंकज कोळी, शरद सपकाळे, दिपक तायडे, दिलीप मोरे आदींसह अंजाळे, अमोदा, कासवा, विरोदा, भुसावळ, यावल, रावेर तालुक्यातील समाजबांधव उपस्थित होते.

शासकिय आदेशही झुगारला
अर्धनग्न मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यासाठी पोहोचला मात्र तेथे शासकीय आदेश असतानाही शनिवारी महर्षी वाल्मिक जयंतीनिमित्ताने पूजन झाले नसल्याची बाब आंदोलकांना समजली. याप्रकरणी समाजबांधवांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. नारायण कोळी यांनी समाजाचा अंत पाहू नका, असे खडसावले. यानंतर तहसीलदार निता लबडे यांनी समाजबांधवांसमोर दिलगिरी व्यक्त करीत प्रतिमा पूजन केले.


कॉपी करू नका.