यावल तहसील कार्यालयात सौर ऊर्जेचा पडणार प्रकाश

वर्षाकाठी दीड लाखाची बचत : दररोज साडेचार युनिट होणार निर्मिती


Yaval tehsil office will be lit by solar energy यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये सौर ऊर्जेच्या तब्बल नऊ प्लेट्स बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. प्रामुख्याने संपूर्ण कार्यालय हे आता सौर ऊर्जेच्या प्रकाशाने लखलखणार असून यामुळे वर्षाकाठी वीज बिलावर होणार्‍या खर्चात दीड लाखांची बचत होणार आहे. विजेच्या लपंडावामुळे व भारनियमनमुळे रेंगाळणारे तहसील कार्यालयाचे कामकाजदेखील पूर्वपदावर येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसील कार्यालयात सौर ऊर्जेच्या प्लेट बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली. संपूर्ण कार्यालय हे सौर उर्जेवर चालेल अशा पद्धतीने नऊ सौर उर्जेच्या प्लेट्स कार्यालयाच्या इमारतीवर लावण्यात येत आहे. ज्यामधून संपूर्ण कार्यालयाचे कामकाज चालेल अशा पद्धतीची वीज निर्मिती होणार आहे.

लवकरच पूर्ण होणार काम
दरमहा येणार्‍या वीजबिलातून कार्यालयाची मुक्तता होणार आहे त्याचबरोबर वादळ, वारा, पाऊस व भारनियमन अंतर्गत खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याचा ताण व वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर कार्यालयाचे ठप्प पडणारे कामकाज त्यातून देखील मुक्तता मिळणार आहे. स्वविद्युत निर्मित सक्षम असे कार्यालय हे होणार आहे. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी सचिन जगताप यांनी कार्यालयाच्या इमारतीवर दिवसभर ज्या ठिकाणी सुर्यप्रकाश असतो ते ठिकाण निश्चित करीत तेथे सौरउर्जेच्या प्लेट्स बसवण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली. लवकरच आता संपूर्ण कामकाज पूर्ण होत कार्यालय सौर ऊर्जेच्या प्रकाशाने लखलखणार आहे.

वर्षाला दीड लाखांची बचत
तहसील कार्यालयात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून घेतलेल्या वीज पुरवठ्याचे मासिक बिल सुमारे 12 ते 15 हजार दरम्यान येते व वर्षाकाठी सुमारे एक लाख 80 हजार रुपये पर्यंत वीज बिल तहसील कार्यालयाकडून अदा केले जाते मात्र आता सौर ऊर्जेने कार्यालय सक्षम झाल्यानंतर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या विजेचा वापर कमी प्रमाणात होईल त्यामुळे वर्षाकाठी दीड लाखाची बचत शक्य होणार आहे. विविध कारणाने तसेच भारनियमन झाल्यास वीजपुरवठा खंडित व्हायचा यामुळे तहसील कार्यालयाची ऑनलाईनची संपूर्ण काम ठप्प व्हायचे. तहसील कार्यालय केवळ वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्यने व इन्व्हर्टर किंवा जनरेटर नसल्यामुळे वीज पुरवठा कधी सुरळीत होईल याची वाट अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पहावी लागत होती मात्र ही समस्या देखील आता या सौर ऊर्जेच्या जोडणीमुळे सुटणार आहे.

देखभाल दुरुस्तीकडे देणार लक्ष
सौर ऊर्जेच्या नऊ प्लेट्स बसवण्यात येत असून एका प्लेट मधून अर्धा युनिट असे नऊ प्लेटच्या माध्यमातून तब्बल साडेचार युनिट वीज निर्मिती होणार आहे. या संपूर्ण यंत्रणेची देखभाल दुरुस्तीदेखील वेळेत करण्याकरीता आम्ही जातीने लक्ष देऊ, असे प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !