अहमदनगरमध्ये एसीबीची सर्वात मोठी कारवाई : एक कोटींची लाच घेताना अधिकारी जाळ्यात
ACB’s biggest action in Ahmednagar : Officials nabbed for taking Rs 1 crore bribe नाशिक : नाशिक एसीबीच्या पथकाने अहमदनगरमध्ये एक कोटी रुपयांची लाच घेताना वर्ग- एकच्या अधिकार्याला लाच घेताना पकडल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. अत्यंत गोपनीय पद्धत्तीने ही कारवाई करण्यात आली असून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती शिवाय लाचखोर अधिकार्यांच्या सहकार्याला पकडण्यासाठी चार अधिकार्यांचे पथक रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान, लाचखोर अधिकारी हा जलसंपदा वा बांधकाम विभागाशी निगडीत असल्याची माहिती आहे. या संदर्भातील अधिक माहिती नाशिक येथे एसीबीचे महासंचालक विश्वास नागरे पाटील हे शनिवारी माध्यमांना देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एक कोटींच्या लाचेने नगर हादरले
समजलेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील शेंडी परिसरात छापा टाकून बांधकाम विभागातील एका क्लास वन अधिकार्याला एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेताना पकडण्यात आले आहे. एसीबीच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई शुक्रवार, 3 रोजी रात्री उशिरा करण्यात आली शिवाय लाचखोर अधिकार्याच्या एका सहकार्याचा सहभाग आढळल्याने त्यासदेखील ताब्यात घेण्यासाठी रात्री उशिरा पथक रवाना झाल्याचे समजते.




सायंकाळी उशिरा कारवाई
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रारदाराने लाचेसंदर्भात तक्रार केल्यानंतर नाशिक एसीबीच्या पथकाने सापळा रचला. लाच स्वीकारल्यानंतर या प्रकरणात आणखी काही लाचखोर सहभागी असल्याने त्यांना पकडण्यासाठी पथके रवाना झाली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तयारी रात्री उशिरा सुरू होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील हेदेखील या गुन्ह्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून शनिवारी सकाळी नाशिक येथे ते या संदर्भात पत्रकार परीषद घेऊन माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबतचे वृत्त आज आघाडीच्या दैनिकांनी दिले आहे.