भुसावळ तालुक्यात सात ग्रामपंचायतीसाठी चुरशीची निवडणूक : 76.29 टक्के मतदान

वराडसीम-सुनसगावला मतदारांच्या रांगा : लक्ष्मी दर्शनाची चर्चा : आज दोन तासात हाती येणार निकाल


Tight election for seven gram panchayats in Bhusawal taluka: 76.29 percent polling भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींसाठी लोकनियुक्त सरपंचांसह दोन ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीच्या वातावरणात रविवारी पोटनिवडणूक झाली. सात ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत 16 हजार 306 मतदारांपैकी 12 हजार 440 मतदारांनी (76.29) मतदारांनी हक्क बजावला. भुसावळ तालुक्यातील वराडसीम व सुनसगाव येथे सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर अनेक ठिकाणी मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याची जोरदार चर्चा होती. भुसावळ तालक्यात सर्वाधिक मतदान चोरवड येथे 89.89 टक्के तर सर्वांत कमी 68.71 टक्के मतदान फुलगावात झाले.

सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक : शांततेत मतदान
भुसावळ तहसील कार्यालयातील निवडणूक सूत्रांच्या माहितीनुसार वराडसीम-जोगलखोरी येथे चार हजार 319 पैकी तीन हजार 104 मतदारांनी (71.87) टक्के हक्क बजावला. फुलगाव- तीन हजार 119 पैकी दोन हजार 339 (70.19 टक्के) हक्क बजावला. तर अंजनसोडे येथे एकूण 923 मतदारांपैकी 804 मतदारांनी (87.11) हक्क बजावला. विल्हाळे येथे एकूण एक हजार 620 मतदारांपैकी एक हजार 298 (80.12) मतदारांनी हक्क बजावला. सुनसगाव येथे दोन हजार 521 मतदारांपैकी एक हजार 876 (74.41) मतदारांनी हक्क बजावला. गोजोरे येथे एक हजार 911 मतदारांपैकी एक हजार 587 (83.05) मतदारांनी हक्क बजावला. चोरवड येथे एक हजार 593 पैकी एक हजार 432 (89.89) मतदारांनी हक्क बजावला. सात ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत 16 हजार 306 मतदारांपैकी 12 हजार 440 मतदारांनी (76.29) मतदारांनी हक्क बजावला. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात मांडवेदिगर व हतनूर येथे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्यात मांडवेदिगर येथे 513 मतदारांपैकी 406 (79.14) तर हतनूर येथे 538 पैकी 417 (77.51) मतदारांनी हक्क बजावला. पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रावर चोख बंदोबस्त होता. भुसावळ तहसीलदार निता लबडे यांनी मतदान केंद्रांना सकाळी भेटी दिल्या.


आज दोन तासात हाती येणार निकाल
अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या निवडणुकीनंतर सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता मतदानाची मतमोजणी तहसील कार्यालयात होईल. त्यासाठी पाच टेबल लावण्यात येणार आहेत. तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होईल. दोन तासात सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे. मतमोजणी ठिकाणी शहर पोलिस ठाण्याचा बंदोबस्त असेल.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !