‘रास दाडिंया’ने नवरात्रीत संचारला उत्साह ; कलाविष्कार सादर करणार्या महिलांचा सन्मान
चाळीसगाव : ‘ढोली तारो ढोल बाजे’, ‘ढोलीडा’, ’उडी उडी जाये’.. अशा अनेकविध गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करणार्या तरुणी, पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादरीकरण करणार्या महिला भगिनी, गीतांवर थिरकणारी तरुणाई अशा आनंदीमय वातावरणात नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला. शहरातील हनुमानवाडी परीसरातील कै सौ.सुवर्णाताई देशमुख नवरात्र उत्सव मंडळ आयोजित दांडीया गरबा कार्यक्रमाचा आनंद चाळीसगाववासियांनी लुटला.
पारीतोषिकाने माता-भगिनींचा सन्मान
नवरात्र उत्सवादरम्यान शहरातील हनुमानवाडी परिसरात आयोजित दांडिया रास तसेच गरबा नृत्यातून उत्तम वेशभूषा, नेपथ्य वा सादरीकरण करणार्या महिला भगिनी, युवतींना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नानाविध बक्षीसांची लयलूट करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेतून विजयी ठरलेल्या चिमुरड्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप निकम व सहकार्यांचे अनमोल सहकार्य लाभले.

परिसरातील महिला भगिनींसह युवा वर्ग व चिमुरड्यांनी दाखवलेला प्रतिसाद आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेला नवरात्र उत्सव आनंददायी राहिला, असे माजी नगरसेविका सुमन आधार निकम म्हणाल्या.






