भुसावळ शहरातील अंडरपासचा सुटणार तिढा !
जिल्हाधिकार्यांची भुसावळात बैठक : नहींच्या अधिकार्यांना सूचना ; मातीचा भराव करणार्यावर होणार कायदेशीर कारवाई
Underpass in Bhusawal city will be released! भुसावळ : शहराला लागून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील अयोध्यानगर-वांजोळा रोडवरील बोगद्यानजीक सातत्याने अपघात होत असल्याने आमदार संजय सावकारे यांनी सलग दोन बैठकीत हा विषय लावून धरला होता. भुसावळात विविध बैठकीच्या निमित्ताने आलेल्या जिल्हाधिकार्यांकडे आमदारांनी हा विषय मांडल्यानंतर उभयंतांनी बुधवारी बोगद्याची पाहणी केली. यावेळी नहींच्या अधिकार्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या त्यामुळे आगामी काळात बोगद्याचा (अंडरपास) तिढा सुटण्याची आशा आहे. दरम्यान, बोगद्याच्या पाहणीप्रसंगी मातीचा भराव केल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संबंधिताचा शोध घेवून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची सूचना केली.
कुणबी मोडी लिपितील नोंदीबाबत आढावा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी डीआरएम कार्यालय, प्रांत कार्यालयात विविध विभागाच्या बैठकी घेतल्या. भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात कुणबी मोडी लिपिबाबत व पुराव्यांबाबत त्यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडून आढावा घेतला. पालिका, शिक्षण विभाग, महामार्ग प्राधीकरण, भूसंपादन आदी विषयांबाबतही त्यांनी माहिती जाणून संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या. यावेळी आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी जितेद्र पाटील, तहसीलदार निता लबडे यांची उपस्थिती होती.


आमदारांचा सेंट्रल किचनचा प्रस्ताव
भुसावळ तालुक्यातील शाळांना सेंट्रल किचन असावे, अशी संकल्पना आमदार संजय सावकारे यांनी मांडली. जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी, गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार प्रमुख यांना आमदार सावकारेंचे पत्र घेऊन अहवाल तयार करण्यास सांगितले.
नहींच्या अधिकार्यांना सूचना
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांशी जिल्हाधिकार्यांनी सूचना देत भुसावळातील अंडरपासचा तिढा सोडवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आमदारांसह त्यांनी प्रत्यक्ष बोगद्याची पाहणी केली. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, माजी नगरसेवक पिंटू ठाकूर व नहींचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दीपनगर येथील 660 मेगावॅट प्रकल्पाची आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. यावेळी नवीन प्रकल्पात स्टेशन ट्रान्सफार्मर कार्यान्वीत करण्यात आला. दरम्यान, जानेवारी महिन्यात प्रकल्प कार्यान्वीत होण्याची अपेक्षा आहे.





