नाथाभाऊ मुख्यमंत्र्यांना स्पष्टच म्हणाले …; तर माझ्या आयुष्याचे विमान लॅण्ड झाले नसते
मुंंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे हेवी वेट नेते आमदार एकनाथराव खडसे यांची नुकतीच प्रकृती खालावल्यानंतर त्यांना मुंबईत एअर अॅम्बुलन्सने हलवण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पुढाकार घेत यंत्रणांना निर्देश दिले होते. आजारातून बरे झालेल्या आमदार खडसे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व त्यांचे आभारही मानले. तुमचे विमान वेळेवर टेक ऑफ झाले नसते तर माझ्या आयुष्याचे विमान लँड झाले नसते, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्याचे आभार मानले.
आमदार खडसेंनी मानले आभार
आमदार खडसे संवाद साधताना म्हणाले की, एअर अॅब्युलन्स मिळत नव्हती. एक मिळाली ती नाशिकला उभीही होती. मात्र एटीसी क्लिअरन्स मिळत नव्हता. तुम्ही बोलल्यामुळे मिळाली. मी रुग्णालयात आलो. ऑपरेशन थिएटरमध्ये मला नेले तेव्हा अँजिओप्लास्टीचा निर्णय घेतला. दोन ब्लॉकेज 100 टक्के आणि तिसरा 70 टक्के होता. परीस्थिती गंभीर होती. पण त्यांनी अँजिओप्लास्टी केली. ती व्यवस्थित पार पडली. कार्डिअॅक अरेस्ट आला.. माझे हृदय शंभर टक्के बंद पडलं. त्यावेळी दोन मिनिटांची शॉक ट्रिटमेंट दिली. तुमचं विमान वेळेवर आले नसते तर माझे विमान टेक ऑफ झाले असते आणि लँड झालेच नसते. तुमचे आभार. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा! असे एकनाथ खडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवर म्हणाले.


खडसेंना हृदयविकाराचा झटका
मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नेते खडसे यांच्यावर अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया पार पडली. अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला व डॉक्टरांनी शॉक ट्रीटमेंट देऊन बंद पडलेल हृदय पुन्हा सुरू केले.





