यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांनी आपला खर्च टु वोटर अॅपवर सादर करण्याच्या सुचना
यावल : यावल तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत सहभागी सर्व उमेदवारांनी आपापला निवडणुकीचा खर्च राज्य निवडणूक आयोगाच्या टु वोटर अॅपवर सादर करावा, असे आवाहन तथा सुचना तहसीलदारांनी केल्या आहे. निकालानंतर 30 दिवसाच्या आत हा खर्च सादर करणे आवश्यक असून तातडीने सर्व उमेदवारांनी आपापला खर्च सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
निवडणुकीतील खर्च सादर करणे आवश्यक
यावल तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक व चार ग्रामंपचायतीच्या पोटनिवडणुका नुकत्याच पार पडल्या व आता या निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उमेदवारांकडून निवडणुकीतील खर्च सादर करणे आवश्यक आहे. यंदा हा खर्च राज्य निवडणूक आयोगाने ऑनलाईन सादर करण्याचे आदेश काढले आहे. यात निवडणूक लढविणार्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना निवडणुकीचे निकाल घोषीत केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विहीत पध्दतीने निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्यक आहे. सदर खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी टु वोटर अॅपचा वापर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. यासाठी गुगल / अॅपल प्लेस्टोअर वरुन टु वोटर अॅप डाऊनलोड करुन त्याद्वारे खर्चाचा हिशोब सादर करणेबाबत निर्देश दिले आहेत. उमेदवारांनी आपापला निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.







