भुसावळात महिला लोकशाही दिनी एकही तक्रार नाही
भुसावळ : महिलांच्या प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिनाचे शासनाकडून दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी आयोजन केले जाते मात्र पुरेशा जनजागृतीअभावी या लोकशाही दिनाकडे तक्रारदार पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. भुसावळ तहसीलमध्ये सोमवारी आयोजित तक्रार दिनात एकही तक्रार नसल्याचे तहसीलदार निता लबडे यांनी सांगितले. एक तक्रार टपालाने प्राप्त झाली मात्र ती दीपनगरशी संबंधित अतिक्रमणाची असल्याने ती संबंधित विभागाला पाठवण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.
जनजागृतीअभावी तक्रारदारांची पाठ
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास खात्याच्या निर्णयानुसार, प्रत्येक महिन्याच्या तिसर्या सोमवारी तालुका व जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. भुसावळ तहसील कार्यालयात आयोजित या दिनास केवळ तहसीलदार उपस्थित होत्या मात्र या दिनी एकही तक्रार दाखल करण्यात आली नाही, असे सूत्रांनी सांगितले. महिला लोकशाही दिनात महिलांना आपल्या वैयक्तिक तक्रारी नोंदवता येतात शिवाय पोलिस, महसूल, एस.टी.बांधकाम, महावितरण आदींबाबतही तक्रारी करता येतात.







