चुंचाळेत सुकनाथ बाबा मूर्ती स्थापना वर्धापनदिन सोहळ्यात भाविकांची उसळली गर्दी


यावल : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री वासुदेव बाबा दरबारात श्री समर्थ सुकनाथ बाबा मूर्ती स्थापनेचा वर्धापनदिन सोहळा शुक्रवारी मोठ्या उत्साहात झाला. सकाळपासून धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर 21 किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व मंदिर दर्शनाकरीता खुले करण्यात आले. हजारो भाविक, भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

21 किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चुंचाळे, ता.यावल येथे शुक्रवारी मोठ्या उत्साहात श्री वासुदेव बाबांनी त्यांचे गुरु श्री समर्थ सुकनाथ बाबा यांचा मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन सोहळा पार पडला. 21 किलो चांदीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्ती स्थापना वर्धापनदिन कार्यक्रमाची परंपरा शिष्य व गावकरी मंडळींनी सतत सुरू ठेवली होती. पहाटे सहा वाजता मारोती अभिषेक, साडेसहाला सुकनाथ बाबा व रघुनाथ बाबा, वासुदेव बाबा, समाधीवाले बाबा यांच्या मूर्तीला स्नान व मूर्ती अभिषेक, साडेसातला आरती, साडेआठपासून भजन भारुडांना सुरुवात करण्यात आली होती व मूर्ती प्राणप्रतिष्ठा विधीवत पार पडली तर दुपारी 12 वाजेला महाआरती होऊन दुपारी एक वाजेपासून महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. सायंकाळ उशीरापर्यंत हजारो भाविक, भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


अशी आहे आख्यायिका
सुकनाथ बाबांनी येथे अखंड 12 वर्ष तप केल्याने या गावास महत्व प्राप्त झाले आहे. सुकनाथ बाबा काशी येथून भ्रमण करीत चुंचाळे येथे आले होते. बाबांना पशु पक्षांची बोली अवगत होती. वर्षाकाठी पशूपक्षांना सहा ते सात क्विंटल धान्य दररोज खाऊ घालत होते. 12 वर्ष ज्या जागेवर बाबांनी तप केले त्या ठिकाणी असलेली मातीची टेकडी गावकरी मंडळीना उकरायला सांगितले असता त्यामंध्ये पुरातन समाधी निघाली. त्या दिवसापासून पूजा-आरती सुरू करून बाबांची समाधीवाले बाबा अशी ओळख झाली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !