गिरीशभाऊ सांगा ; जोडे मारण्यासाठी कुठे येवू ! : आमदार खडसेंचा सवाल
Girishbhau tell me ; Where to come to join ! : Question of MLA Khadse जळगाव : मृत्यूच्या दाढेतून मी परत आल्यानंतरही मंत्री गिरीश महाजन यांनी माझ्यावर अत्यंत खालच्या स्तरावरील टिका केली व त्यामुळे आपली मोठी मानहानी झाल्याने त्यांना आपण अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली असल्याची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी रविवारी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री विरोधक असूनही त्यांनी एअर अॅम्बुलन्स पाठविली, रुग्णालयात उपचार सुरु असतानाच ह्दय बंद पडले. तेथे सर्व यंत्रणा असल्याने काही सेंकदात शॉक देऊन हृदय सुरू केले त्यामुळे असे असताना आजारपणावर शंका घेणे चुकीचे आहे. माझा आजार खरा असल्याचे सिद्ध झाल्याने आता गिरीशभाऊ तुम्ही सांगा, जोडे मारण्यासाठी कुठे येवू ? असा प्रश्न आमदार खडसे यांनी यावेळी उपस्थित केला.
गिरीश भाऊंनी आव्हान स्वीकारावे
मृत्यूच्या दाढेतून मी परत आल्यानंतरही महाजनांनी माझ्या आजारपणावर शंका घेतली ही बाब दुर्दैवी आहे. आता तर रुग्णालयाचे प्रमाणपत्रच प्राप्त झाल्याने आजार खरा वा खोटा सिद्ध झाले आहे त्यामुळे मंत्री महाजनांनी माझे चॅलेंज स्विकारावे. शहरात आपल्याविरुध्द आंदोलन करणार्यांना मीच मोठे केले आहे. गौण खनिज प्रकरणात नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीत माझे नाव नव्हते, शेवटच्या क्षणी अधिकार्यांवर दबाव टाकून खडसे कुटूंबियांचे नाव घेण्यात आले, असा दावा आमदार खडसे यांनी यावेळी केला. या प्रकरणात ठेकेदाराला जबाबदार धरुन नोटीस देणे अपेक्षित होते व ठेकेदार आजही दंडाची रक्कम भरायला तयार आहे, असेही ते म्हणाले.


तर महाजनांचा जाहीर सत्कार करू
शेतकर्यांचा आत्मा जळतो आहे कारण दोन वर्षापूर्वी कापसाला 12 हजार रुपये भाव होता मात्र आता सहा हजार रुपये आहे. तीन मंत्री असताना एकही प्रकल्प जिल्ह्यात आला नसल्याचे दुःख आहे. संकटमोचकांनी शेतकर्यांवरील हे संकट दूर करावे, अशी अपेक्षा आमदार खडसेंनी केली. जळगावात मंजूर झालेले कृषी महाविद्यालय राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरला घेऊन गेले तर दुसरे महाविद्यालय अब्दुल सत्तार सिल्लोडला घेऊन गेले. मी मंत्री असताना बोदवड व धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. महाजन यांनी शेंदूर्णी किंवा पहूर यापैकी एक तरी तालुका निर्माण करावा, आपण त्यांचा जाहिर सत्कार करू, असे आव्हानही त्यांनी दिले. खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्याला भाजपचे संस्कार शिकवू नये, असेही खडसे म्हणाले.





