भुसावळातील अमृत टप्पा दोनच्या तांत्रिक मंजूरीचा मार्ग मोकळा
आमदार संजय सावकारेंची मुंबईत अधिकार्यांसोबत बैठक
Clear the way for technical approval of Amrit Phase II in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणार्या अमृत योजना टप्प्या दोनच्या प्रस्तावात त्रृटी नसल्याने आता तांत्रिक मंजूरीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील पाच ते सहा शहरांच्या प्रस्तावातील त्रृटी दूर करून हे सर्व प्रस्ताव एकत्रीत तांत्रिक मंजुरीसाठी पाठवले जाणार आहे. मंगळवारी मुंबईत अमृत टप्पा दोनबाबत बैठक झाली. या बैठकीत अमृत दोनच्या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
मुंबईतील मंत्रालयात बैठक
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातंर्गत मंजूर अमृत योजनेच्या टप्पा दोनच्या संदर्भात मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला नगरविकास विभाग, एमजीपीचे अधिकारी, आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत भुसावळचा उल्लेख केंद्र शासनाच्या टप्प्या दोनच्या यादीत नसल्याने निर्माण झालेल्या गोंधळाबाबत आमदार सावकारे यांनी प्रश्न विचारला यावर अधिकार्यांनी टप्पा दोनमध्ये भुसावळचा उल्लेख असल्याचे स्पष्ट केले. यासोबत भुसावळ टप्पा दोनच्या प्रस्तावात कोणत्याही त्रृटी नाहीत. मात्र यासोबत पाठविण्यात येणार्या पाच ते सहा शहराच्या प्रस्तावात त्रुटी आहेत. त्या दूर करुन सर्व प्रस्ताव तांत्रिक मंजूरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. यामुळे आगामी काळात लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.


ठेकेदाराला नोटीस बजावणार
अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामेही सध्या संथगतीने सुरू आहेत. या प्रश्नीही बैठकीत चर्चा झाली. संबधीत कामे घेतलेल्या ठेकेदाराला या प्रकरणी नोटीस बजावण्यात येणार आहे. यानंतरही कामांना गती मिळाली नाही तर पुढील कारवाई केली जाईल, या संदर्भातही बैठकीत चर्चा झाली. यामुळे आता रेंगाळलेल्या कामांनाही गती येण्याची आशा आहे.





