यावल शहराच्या विकास कामांसाठी साडे सहा कोटी रुपये निधी मंजूर

कामे लोकसभा निवडणुकीपूर्वी होणे अपेक्षीत : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील


यावल : शहरातील विविध विकासकामांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने साडेसहा कोटीचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील बोरावल गेटपासून भुसावळ नाका रस्ता डांबरीकरणासह विस्तारीत भागातील रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरण व सांडपाण्याच्या निचर्‍याकरीता गटारीसह विविध कामे केली जाणार आहे तर सदर कामे लोकसभा निवडणुकीपुर्वी व्हावे, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सन 2023-24 लेखाशीर्ष अंतर्गत यावल नगरपरीषदेच्या क्षेत्रातील विविध भागात विकासकामे करण्यासाठी सहा कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

विकासकामांसाठी साडेसहा कोटींचा निधी मंजूर
यावल नगरपरीषदेच्या हद्दीतील विविध विकास कामांसाठी 6 नोव्हेंबर 2023 शासन निर्णयानुसार वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत तब्बल सहा कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये तारकेश्वर महादेव मंदिराला संरक्षण भिंत व सुशोभीकरणासाठी 80 लक्ष, बोरावल गेट ते भुसावळ नाका रस्ता डांबरीकरण व काँक्रिट डिव्हायडर बांधण्यासाठी एक कोटी रुपये, विस्तारीत भागातील न्यू व्यास नगर पांडुरंग सराफ नगर व स्वामी समर्थ नगरात रस्ते मजबुतीकरण करणे व डांबरीकरण करण्यासाठी एक कोटी रुपये, आयेशा नगर प्रभुलीला नगर व स्वामीनारायण नगर भागात रस्ते डांबरीकरण व गटार बांधकामासाठी एक कोटी 70 लक्ष, गजानन महाराज मंदिर परीसर, बाबा नगर रजा नगर, ईकरा नगर भागात डांबरीकरण व गटार बांधकामासाठी एक कोटी, गट नं.709, 710 व 712 मध्ये रस्ते खडीकरण डांबरीकरण व गटार बांधकामासाठी 50 लक्ष व डांगपूरा कब्रस्तानाला संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लक्ष असे एकूण 6 कोटी 50 लक्ष मंजूर करण्यात आले. ही कामे करण्यासाठी कार्यान्वित यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग राहील, असे पत्रात नमूद करण्यात आले. शासन निर्णयाचे पत्र नुकतेच यावल नगरपरीषदेला प्राप्त झाल्याने व निधी मंजूर झाल्याने शहरातील विविध विकास कामांना हातभार लागणार आहे.


आचारसंहिता पूर्वी कामे सुरू व्हावीत
शहराच्या विविध विकास कामांसाठी सुमारे साडे सहा कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचे पत्र पालिकेला प्राप्त झाले आहे. ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद आहे. मंजुर करण्यात आलेल्या कामांचे अंदाजपत्रक तयार करून त्या कामांना तांत्रिक मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मान्यता घेऊन निविदा सूचना काढून प्रक्रिया पुर्ण करून प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करावे लागणार आहे. ही सर्व कामे विहित मुदतीत करावीत अशी अपेक्षा आहे कारण एप्रिल 2024 ला लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी मध्येआचारसंहिता लागू शकते. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याआधी प्रत्यक्ष कामे सुरू व्हावीत, अशी अपेक्षा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !