अयोध्येत रामलल्लांच्या मूर्ती स्थापनेनंतर 22 जानेवारीला जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी होणार !
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे : भुसावळात सुपर्स वॉरीयर्सशी संवाद
BJP state president Chandrasekhar Bawankule भुसावळ : तब्बल 527 वर्षानंतर अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू रामलल्ला भव्य अशा राममंदिरात विराजमान होणार आहे. या दिवशी जगातील सर्वात मोठी दिवाळी साजरी केली जाणार आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूनी या दिवशी आपल्या घरात दिवा लावावा, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुसावळात केले. शहरातील सिंधी कॉलनीतील बडा सेवा मंडळात गुरुवारी सायंकाळी त्यांनी सुपर्स वॉरीयर्सशी संवाद साधला तसेच भुसावळ, चोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघाबाबत बैठकही घेतली. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत घर-घर चलो अभियान व 250 मीटरची रॅली काढण्यात आली. अग्रभागी भजनी मंडळ, डीजेचा ताल व भगव्या फेटेदारी महिलांसह शेकडो कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा जयघोष केल्याने सिंधी कॉलनीत भाजपमय वातावरण निर्माण झाले.
प्रत्येक घरी हिंदूंनी लावावा दिवा
बडा सेवा मंडळातील कार्यक्रमानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत 2024 साठी महाविजय रॅली तसेच घर-घर चलो अभियान अंतर्गत बावनकुळे यांनी रवी फॅन्सिंगवाले यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी बावनकुळे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले तसेच विविध समाजाच्या शिष्टमंडळांतर्फे त्यांना निवेदन देवून पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवण्यात आला. सिंधी कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ झालेल्या कॉर्नर सभेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले की, 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान होत असून या दिवशी देशातील सर्वात मोठी दिवाळी असेल. प्रत्येक हिंदू बांधवांनी यावेळी घरात दिवा लावावा, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल 527 वर्षांनी हा योग जुळून आल्याचे ते म्हणाले. पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुसावळात सभा होणार असल्याचेही बावनकुळे यावेळी म्हणाले.


पाच हजार रामभक्तांना दर्शन घडवा
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन करीत असताना आमदार संजय सावकारे यांना जवळ बोलावून प्रभू श्रीरामांचा जयघोष करीत उपस्थितांना अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी यायचे नाही ना म्हणून विचारला केल्याने सर्वांनीच होकार दर्शवल्यानंतर 22 जानेवारी ते 22 सप्टेंबदरम्यानच्या काळात पाच हजार रामभक्तांना अयोध्येत दर्शन घडवण्याची जवाबदारी आमदार संजय सावकारे यांच्यावर सोपवली व आमदारांनीदेखील तत्काळ त्यास होकार दिला. तातडीने त्यासाठी पदाधिकार्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन बावनकुळे यांनी केले तर खासदार रक्षा खडसे यांनी त्यासाठी पक्षातर्फे व आपल्यातर्फे रेल्वे बुकींग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली.

यांची होती उपस्थिती
यावेळी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, माजी नगरसेवक युवराज लोणारी, बापू महाजन, अॅड.बोधराज चौधरी, रमेश नागराणी, राजेंद्र आवटे, किरण कोलते, पिंटू ठाकूर, प्रमोद नेमाडे, शेखर इंगळे, अजय नागराणी, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे, शिशिर जावळे, सुमित बर्हाटे, सामाजिक कार्यकर्ता प्रमोद सावकारे, देवा वाणी, विशाल जंगले, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, युवा मोर्चा सरचिटणीस श्रेयस शेखर इंगळे, मोंटू अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





