भुसावळ बसस्थानकात निर्माण झाले तळे : प्रवाशांचे अतोनात हाल
बसस्थानक कात टाकणार कधी ? संतप्त प्रवाशांचा सवाल : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा
Bhusawal bus stand was constructed, then: passengers are in dire straits भुसावळ : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भुसावळ बसस्थानकात तळे निर्माण झाले आहे. बसस्थानकात आवारात बसेस येताच खड्ड्यातील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत असून खड्ड्यांचा अडथळा पार करून प्रवाशांना बस पकडावी लागत आहे शिवाय संपूर्ण बसस्थानक आवारात जागोजागी खड्डे निर्माण झाल्याने चालकांना बसस्थानकाच्या आवारात बस आणताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बसस्थानकाची दुरवस्था कायम असल्याने सुज्ञ लोकप्रतिनिधींनी दखल घ्यावी तसेच एस.टी.महामंडळानेदेखील बसस्थानक आवाराचे काँक्रिटीकरण करावे, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवाशांचे मार्गक्रमण
रेल्वेच्या जंक्शन स्थानकाला लागूनच बसस्थानक असल्याने हजारो प्रवाशांची गर्दी दिवसभरात बसस्थानकावर असते मात्र यापूर्वीच बसस्थानकाची दुरवस्था झाली असताना नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे बसस्थानक आणखीन खड्ड्यात गेले आहे. बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्यानंतर त्यात आता पाणी साचले असून बस येताच हे पाणी उडत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे शिवाय बसेसपर्यंत जाण्यासाठी दुर्गंधीयुक्त पाण्यातून प्रवाशांना वाट काढावी लागत असल्याने प्रवाशांच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकाराने आबालवृद्ध प्रवाशांना तर फार मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने बसस्थानक प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.


निधी प्रस्तावीत मात्र काम होणार कधी ?
भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ बसस्थानकाच्या दुर्दशेबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. भुसावळ बसस्थानकाची वर्तमान स्थिती तसेच बसपोर्ट उभारण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे पुढे काय झाले ? अशी विचारणा केल्यानंतर त्यावेळी सार्वजनिक बांधकाम, सामाजिक उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी भुसावळ येथे बसपोर्ट उभरण्याबाबत यापूर्वी काही कार्यवाही झाली असेल तर ती वस्तुस्थिती तपासून त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे तसेच बसस्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी दोन कोटी 18 लाखांचा निधी प्रस्तावीत असल्याची माहिती जुलै 2023 मध्ये सभागृहात दिली होती मात्र या बाबीला चार महिने उलटल्यानंतरही प्रत्यक्षात कुठलीही कृती नसल्याने प्रवासीवर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
इलेक्ट्रीक बसची अद्यापही प्रतीक्षाच
भुसावळ बस आगाराला 20 इलेक्ट्रीक बसेस उपलब्ध करून देण्याचे दादा भुसे यांनी आश्वासन दिले होते मात्र अद्यापही आगाराला बसेसची प्रतीक्षा आहे. या बसेस उपलब्ध झाल्यास डिझेल खर्चात बचत होईल व उत्पन्नात वाढ होवून प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थ्यांना या बसेसमुळे मोठी उपलब्धी उपलब्ध होणार आहे मात्र त्यासाठी एस.टी.महामंडळाने दखल घेणे अपेक्षित आहे.
अवैध वाहतुकीची डोकेदुखी
भुसावळ आगाराला अवैध वाहतूक मोठे डोकुदखी ठरत आहे. बसस्थानकाच्या बाहेरच अवैध वाहतूकदार आपली वाहने लावून प्रवाशांची पळवा-पळवी करीत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नाला त्यामुळे फटका बसत आहे. आगाराच्या किमान दोनशे मीटर अंतरापर्यंत खाजगी वाहतूकदारांना वाहने लावण्यास मनाई असलीतरी नियम मात्र बासनात गुंडाळून अवैध वाहतुकीला ऊ्त आला आहे. सजग पोलिस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेण्याची अपेक्षा आहे.





