राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची भरदिवसा निर्घृण हत्या
Rashtriya Rajput Karni Sena President Sukhdev Singh Gogamedi brutally murdered in broad daylight नवी दिल्ली : राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. हल्लेखोरांनी जयपूरमधील घरात घुसून गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या केली. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेत नवीन सिंह शक्तिवत या मुलताई शाहपुरा येथील रहिवाशाचा मृत्यू झाला असून तो हल्लेखोरांना गोगामेडी यांच्या घरात घेवून गेल्याचे सांगण्यात आले.
गार्डदेखील जखमी
गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले गार्ड अजित सिंग हे गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना गोगामेडी यांच्या घरी घेऊन गेलेल्या तरुणाचाही हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. गँगस्टर रोहित गोदाराने हत्येची जबाबदारी घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अचानक केला गोळीबार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंह गोगामेडी यांचे घर श्यामनगर जनपथवर आहे. मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास तीन हल्लेखोर त्यांच्या घरी पोहोचले. आधी ते सोफ्यावर बसले आणि गोगामेडींशी बोलू लागले. सुमारे 10 मिनिटांनंतर दोन हल्लेखोर उठले आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबार सुरू असताना गोगामेडींच्या गार्डने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरही हल्लेखोरांनी गोळीबार केला.
गँगस्टर रोहित गोदाराने घेतली हत्येची जबाबदारी
येथे घटनेनंतर गँगस्टर रोहित गोदाराच्या नावाने तयार केलेल्या फेसबुक पेजने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. पोस्टमध्ये लिहिले- राम राम, सर्व भावांना, मी रोहित गोदारा कपुरीसर, गोल्डी ब्रार आहे. बंधूंनो, आज सुखदेव गोगामेडी यांची हत्या झाली. याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतो. आम्ही ही हत्या घडवून आणली आहे.
बंधूंनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की तो आमच्या शत्रूंना सहकार्य करत होता. त्यांना मजबूत करण्यासाठी काम करत होता. जोपर्यंत शत्रूंचा संबंध आहे, त्यांनी त्यांच्या घराच्या दारात त्यांची अर्थी तयार ठेवावी. त्यांनाही लवकरच भेटू.