भुसावळ पालिकेच्या मुदत संपलेल्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला भाजपाचा तीव्र विरोध
BJP’s strong opposition to the auction process of Bhusawal Corporation’s expired coals भुसावळ : भुसावळातील पालिकेच्या मुदत संपलेल्या एक हजार 265 गाळेधारकांनी पालिकेने गाळ्यांची थकबाकी पूर्ण भरावी तसेच या गाळ्यांची लिलाव व निविदा प्रक्रियेने वितरण होण्याच्या संदर्भात नोटीस बजावली आहे. शासनाच्या या भुमिकेचा शहर भाजपने विरोध दर्शवला आहे. व्यापारी हितासाठी अनेक वर्षांपासून गाळ्यांमध्ये उदरनिर्वाह करणार्यांनाच दुकाने दिली गेली पाहिजे, लिलाव व निविदा प्रक्रिया राबवू नये, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकार्यांनी बुधवारी पालिकेत मुख्याधिकारी महेश वाघमोडेंसमोर मांडली.
गाळे लिलाव रद्दची भाजपाची मागणी
पालिकेच्या मालकिच्या शहरातील 30 व्यापारी संकूलांतील तब्बल 1256 गाळ्यांची मुदत संपली आहे. मुदत गाळ्यांच्या नवीन दरनिश्चितीसाठी पालिका प्रशासनाने नगररचना सहाय्यक संचालकांकडे प्रस्ताव दिला आहे. पालिकेने गाळेधारकांना आपल्या थकबाकीची रक्कम तातडीने पालिकेकडे भरावी तसेच आगामी काळात भाडेनिश्चितीनंतर या गाळ्यांचे लिलाव व निविदा प्रक्रिया होणार असल्याने गाळे रिकामे करावे, अशी नोटीस दिली आहे. या नोटीसीवर शहर भाजपने बुधवारी पालिकेचे कार्यालयासमोर गाळे लिलाव रद्द करा, व्यापार्यांना दिलासा द्या अशा प्रकारची घोषणााबाजी केली. मुख्याधिकारी महेश वाघमोडेंसोबत माजी नगरसेवक युवराज लोणारी, शहराध्यक्ष तथा जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, किरण कोलते, दिनेश राठी, प्रमोद नेमाडे आदींनी व्यापार्यांची भुमिका मांडली. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी पदाधिकार्यांना ही प्रक्रिया सर्व शासनाच्या निर्णयाने राबवित असल्याचे सांगून समाधान करण्याचा प्रयत्न केला.


प्रक्रिया रद्द होणार नाही : सीओ
मुख्याधिकारी वाघमोडे यांनी शासकिय नियमांनुसार मुदत संपलेल्या गाळ्यांचा भाडेपट्टा निश्चित करुन पालिकेचे उत्पन्न वाढवावे लागेल. यानंतर या गाळ्यांचे लिलाव किंवा निविदा प्रकियाच राबवावी लागेल, हे स्पष्ट केले.
डॉ. आंबेडकर संकूलांतील गाळ्यांचेही होणार वितरण
पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकूलातील गाळ्यांचे वितरण करावे, अशी अपेक्षाही भाजपच्या पदाधिकार्यांनी मांडली. यावर मुख्याधिकारी वाघमोडे यांनी या संकूलाच्या गाळ्यांचीही भाडेनिश्चिती होणार आहे. यानंतरच्या काळात सध्याच्या 1265 गाळ्यांच्या सोबतच डॉ. आंबेडकर संकूलातील गाळ्यांचेही वितरण केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी वाघमोडे यांनी स्पष्ट केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, परीक्षीत बर्हाटे, युवराज लोणारी, प्रा.दिनेश राठी, किरण कोलते, निक्की बतरा, अर्जुन खरारे, रमाशंकर दुबे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत कुलकर्णी, पुरुषोत्तम नारखेडे, राजेंद्र नाटकर, महेंद्रसिंग ठाकूर, प्रमोद नेमाडे, संदीप सुरवाडे, रमाशंकर दुबे आदींसह शहर भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





