मोबाईल, इंटरनेट, सामाजिक माध्यमांचा वापर विवेकाने केल्यास घडेल करिअर

अंतर्नाद पुष्पांजली प्रबोधनमाला : व्याख्याते महेश गोरडे यांचा विद्यार्थ्यांना सल्ला


भुसावळ : जगभरातील माहितीचा खजिना क्षणात आपल्यापुढे रिता करणारी, कुणाशीही, केव्हाही क्षणात संपर्क साधून देणारी, संपूर्ण जगाला छोटंसं खेड बनविणारी मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुकसारखी अतिशय उपयुक्त साधन विवेकाने वापरली तर विद्यार्थ्यांना उत्तम ज्ञानार्जन करता येईल, इच्छित करिअर घडविता येईल. स्वत:बरोबरच देशालाही समुद्ध बनवता येईल.परंतु, चुकीचा व अतिवापर मात्र आत्मघात केल्याशिवाय राहणार नाही, असा ईशारा व्याख्याते महेश गोरडे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

अंतर्नाद प्रतिष्ठानचे कार्य अनमोल
अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे काल शुक्रवार, 8 रोजी के नारखेडे विद्यालय येथे माजी ासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित पुष्पांजली प्रबोधन मालेचे द्वितीय पुष्प कुतूहल फाऊंडेशनचे जळगावचे अध्यक्ष आणि व्याख्याते महेश गोरडे यांनी गुंफले. ‘यशोशिखराकडे जातांना’ या विषयावर ते बोलत होते. विचार मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, उपमुख्याध्यापक आर.इ.भोळे, वाय.एन झोपे, एस.एल.राणे, प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन उपस्थित होते. सूत्रसंचालन जीवन महाजन यांनी तर आभार प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाने यांनी मानले. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक डॉ.संजू भटकर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एन.बी.किरंगे यांनी अंतर्नाद प्रतिष्ठानचे कार्य समाजाला चांगली दिशा मिळवून देण्यासाठी अनमोल असल्याचे सांगितले.


रोज मिळणार्‍या माहितीचा वापर करणार केव्हा ?
ज्ञानासाठी व कौशल्य विकसनासाठी या साधनांचा वापर करणार असाल तर त्यातून शिकलेले ज्ञान प्रत्यक्ष वापरात, कृतीतही आणायचे आहे याचे भान विद्यार्थ्यांना राहत नाहीत. ते त्यातच अडकून पडतात. अनेक वर्षांपासून रोज या साधनांचा वापर करून मिळवीत असलेल्या प्रचंड ज्ञान-माहिती-शिक्षण- संपर्काचा उपयोग तुम्ही नेमका केव्हा करणार ? असा प्रश्न महेश गोरडे यांनी विद्यार्थ्यांना विचारला..

मग त्या माहितीचा काय उपयोग?
रोज माहिती मिळवायची व मेंदूत भरायची, असे करून करून आपण मेंदूला गोदामच बनवून टाकले आहे! या सर्व पसार्‍यातील जी माहिती आपण वापरत नाही तिला आपला मेंदू कालांतराने डीलिट करत जातो, अगदी मोबाईलप्रमाणेच.तरुणांनो, खरंच गांभीर्याने विचार करा, एवढ्या सर्व ज्ञान-माहितीतून आपण प्रत्यक्ष वापर कधी केलाय ? जर फक्त डोक्यात भरायचेच असेल, प्रत्यक्षात वापरायचेच नसेल, तर काय उपयोग जगाशी कनेक्ट राहण्याचा? मिळविलेल्या माहितीचा? गेल्या अनेक वर्षांमधील उमेदीची तारुण्याची उत्साही वर्षे, महिने, तास तुम्ही या साधनांच्या वापरात घालवली. हीच वर्षे जर मिळविलेल्या ज्ञानातून काहीतरी ‘निर्माण’ करण्यासाठी वापरली तर ? असा प्रश्न महेश गोरडे यांनी विचारला.

आयुष्यातील 15 सोनेरी वर्ष
मोबाईल, टीव्ही, इंटरनेट, या साधनांचा चुकीचा वापर केल्यामुळे आयुष्यातील पंधरा सोनेरी वर्षे कशी वाया जातात याचे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे गणित महेश गोरडे सरांनी विद्यार्थ्यांना उलगडून दाखवले. प्रबोधनमालेसाठी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे यजुर्वेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी अंतर्नाद प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, हितेंद्र नेमाडे, कुंदन वायकोळे, विक्रांत चौधरी,तेजेंद्र महाजन, अमित चौधरी, सचिन पाटील, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नियोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !