अज्ञान हेच शेतकरी आणि बहुजन वर्गाचे शत्रू : साहित्यिक उत्तम कांबळे


Ignorance is the enemy of the peasantry and the Bahujan class : Literary Uttam Kamble भुसावळ : सामाजिक क्रांतीचे दूत महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले शेती आणि शिक्षण विषयक धोरण वर्तमानात प्रामाणिकपणे राबविल्याशिवाय आपल्या देशाची शेती व शिक्षणातून भविष्यात प्रगती होणार नाही, असे प्रतिपादन साहित्यिक, अभ्यासक, विचारवंत व पत्रकार उत्तम कांबळे यांनी केले. ते येथील प्रागतिक विचार मंच या संस्थेने ‘फुले-आंबेडकरांच्या स्मृतिदिना निमित्ताने आयोजित केलेल्या अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
शहरातील माळी समाज मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रागतिक विचार मंचचे अध्यक्ष मुख्याध्यापक जे.पी.सपकाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चौधरी, प्राचार्य सुनील भिरूड, निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप सूर्यवंशी, पत्रकार संजयसिंग चव्हाण, अटल प्रतिष्ठानचे प्रा.सुनील नेवे, सेफ्टी ऑफिसर मोहन सरदार, डॉ.मधू राजेश मानवतकर, रंगकर्मी, दिग्दर्शक आणि प्रागतिक चळवळीचे अभ्यासक अनिल कोष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.


अज्ञान हाच मोठा शत्रू
अभिवादन सभेत ‘वर्तमान काळात फुले -आंबेडकरांच्या विचारांची आवश्यता’, या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करतांना कांबळे पुढे म्हणालेत की, शेतकरी आणि बहुजन वर्गाचे शत्रू अज्ञान आहे. आमच्या अनेक पिढ्या याच अज्ञानामुळे बरबाद झाल्यात. महात्मा फुलेनीं शेतकर्‍यांच्या दुःख, दारीद्य्र व संघर्षाची ही कथा संपविण्यासाठी शिक्षण घेणे हाच एकमेव मार्ग सांगितला. शेतकरी ज्ञानी झाल्याशिवाय त्याला त्याच्या दुःखाचे, गरीबीचे मूळ कारण सापडणार नाही म्हणून त्यांनी इंग्रज सरकारला पत्र पाठवून बहुजन समाजाला शिक्षण देण्याची मागणी केली. कारण इथल्या वर्ण व्यवस्थेने बहुजन वर्गाला शिक्षण जाणीवपूर्वक नाकारले होते. शेतकरी, कष्टकरी वर्ग अज्ञानी राहिल्यामुळे त्यांचे सर्व अंगाने शोषण करणे त्या व्यवस्थेला सोपे झाले होते.

फुले-आंबेडकरांचे विचार कृतीत उतारण्याची गरज
शेतकरी वर्गाने शिक्षण घेऊन आधुनिक शेती , जलसिंचन, पाणी आडवा -पाणी जिरवा, धरणे, कालवे -पाटचार्‍या निर्माण करून बारमाही पाणी शेतीस देऊन उत्पन्न वाढविण्याचे मार्ग निर्माण केले पाहिजे. सोबतच गावा जवळ शेतकर्‍यांच्या बाजारपेठ, शेती मालावर प्रक्रिया उद्योग त्यांच्या मुलांनीं उभारले पाहिजे, असे फुले त्यांच्या ग्रंथात सांगतात. शेतकर्‍याच्या मालाला भाव भेटल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही त्यामुळे बाजारपेठा ही शेतकर्‍यांच्याच असाव्यात. फुलेंचे हे अपूर्ण कार्य त्यांचे वैचारिक शिष्य असलेल्या डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बहुजन-शेतकरी वर्गाला शिक्षण घेण्याचा हक्क देऊन पूर्ण केले. जलसिंचन, नदी जोड प्रकल्प, धरणे निर्मिती, वीज निर्मिती धोरण व शिक्षणाचा हक्क त्यांनी संविधानातून आम्हाला दिला. वर्तमान काळात इथल्या तमाम सरकारांनी ‘फुले- आंबेडकरांचे’ हे विचार कृतीत खर्‍या अर्थाने राबविल्या शिवाय बळीराज्याच्या आत्महत्या व बेरोजगारी थांबणार नाहीत, असेही म्हणाले.

महापुरुषांचा हा मानवतेचा विचार सर्वांनीच अंगीकारावा
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जे.पी.सपकाळे यांनी नव्या पिढीला आमच्या महापुरुषांचा हा मानवतेचा विचार आम्ही सर्वांनी सांगितला पाहिजे, असे सांगितले. सूत्रसंचालन देवेंद्र तायडे तर आभार प्रा.जतीन मेढे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रागतिक विचार मंच, जॉयट्स महिला मंडळ, डॉ.मानवतकर बहुउद्देशीय संस्था, मानवसेवा ईश्वर सेवा कल्याण संघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद आदी संस्थाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परीश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !