अंकलेश्वर-बर्हाणपूर मार्ग चौपदरीकरणातनू फैजपूर-सावदा-रावेरला वगळले
सावदा : अंकलेश्वर-बर्हाणपूर महामार्ग चौपदरीकरणातून रावेर व सावदा या शहरांना वगळण्यात आल्याने या परीसरातून तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आहे. सावदा शहर हे देशामध्ये केळी निर्यातीसाठी प्रसिध्द शहर आहे. असे असताही जमीन भूसंपादनासाठी रावेर व सावदा या शहरांना वगळून ग्रामीण चौपदरीकरण क्षेत्रामार्गे महामार्ग मुक्ताईनगर तालुक्याला जोडला जात आहे.
परीसर दळण-वळणापासून वंचित
पूर्वीपासून अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्यमार्ग क्रमांक-4 वापरात आहे. फैजपूर-सावदा-रावेर ते-चोरवड महाराष्ट्राची सीमा बर्हाणपूरात जाते तसेच सावदा शहर हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तिघा राज्यांना जोडणारे महामार्गावरील महत्वाचे शहर आहे. रावेर, सावदा व फैजपूर परीसर व या शहरातील सर्व शेतकरी बांधव केळी उत्पादक व्यापारी म्हणून जगप्रसिद्ध आहे. असे असतानाही दोन्ही शहरवासीयांना दळण-वळण व व्यवसायापासून वंचित व दूर करण्यात येत आहे. अन्याय होऊ नये अन्यथा ठिया आंदोलन करण्याच इशारा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भाजपा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.


जनआंदोलन उभे राहणार
महामार्गातून फैजपूर, सावदा व रावेर या महत्वपूर्ण शहरांना वगळण्यात आल्याने सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. आता या भागातील सर्वच राजकीय पुढारी या मागणीसाठी आवाज उठवत असून ही मागणी लावून धरत असल्याने आता पुढे या महामार्गात बदल होतो वा नाही याकडे तिन्ही शहरातील नागरीकांचे लक्ष लागून आहे. तसे न झाल्यास नक्कीच याभागात मोठे जनआंदोलन उभे राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.





