संपाचा फटका : भुसावळ शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट

जुनी पेन्शन योजना लागू करण्यावर कर्मचारी ठाम : सामान्यांची गैरसोय


भुसावळ : नवी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच अन्य महत्वपूर्ण मागण्यांसाठी राज्यातील शासकीय-निमशासकीय कर्मचारी गुरुवारपासून बेमुदत संपावर उतरले आहेत. भुसावळातही सर्व कर्मचारी संघटनांनी संपात भाग घेतल्याने गुरुवारी शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला तर विविध शासकीय कामे घेवून आलेल्यांना आल्या पावली माघारी परतावे लागले. कर्मचार्‍यांच्या संपात तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, कृषी विभाग, शिक्षक, भूमी अभिलेख, आरोग्य विभाग, नगर पालिका कार्यालयसह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

विविध मागण्यांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन
प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनानुसार, एन.पी.एस.रद्य करुन सर्व कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, कंत्राटी भरती रद्द करुन खाजगी कंपन्यांमार्फत भरती प्रक्रीया बंद करावी व कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करण्यात यावे, समान काम समान वेतन लागू करावे, खाजगीकरणाचे धोरण व आऊटसोर्सीग पध्दत पूर्णत कायम बंद करण्यात यावी, तलाठी, मंडळाधिकारी, लिपीक/लेखा/आरोग्य कर्मचारी/वाहन चालक/चतुर्थश्रेणी कर्मचारी/ग्रामसेवक व ईतर कर्मचार्‍यांचे वेतन श्रेणीतील वेतनत्रृटी तत्काळ दुर कराव्यात, मंजूर आकृतीबंधाप्रमाणे चार लाख रीक्त पदे कायमस्वरुपी भरावीत यासह विविध मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.


संपामुळे तहसील कार्यालय ओस
तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी संपावर उतरल्याने गुरुवारी तहसील कार्यालय ओस पडले होते. यावेळी तहसीलमधील राज्य कर्मचार्‍यांनी एकत्र येत शासनाच्याविरूध्द घोषणाबाजी केली. महसूल, प्रांत कार्यालय, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी कार्यालयातील कर्मचारी यावेळी तहसील कार्यालयात जमा झाले होते. तहसील कार्यालयात घोषणाबाजी झाल्यावर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. तहसीलदार निता लबडे व नायब तहसीलदार हे सुध्दा एक दिवसीय लाक्षणिक रजेवर असल्याने गुरुवारी कुठलीही कामे झाली नाहीत.

प्रांताधिकारी कार्यालयात शुकशुकाट
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व नायब तहसीलदार तथा शिरस्तेदार प्रीती लुटे यादेखील सामूहिक रजेवर असल्याने गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयात सुध्दा शुकशुकाट दिसून आला.

नागरीक आल्या पावली परतले
प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शासकीय कार्यालयात शुकशुकाट जाणवला. कुणीही कर्मचारी कार्यालयात नसल्याने रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजनेसह विविध कामांसाठी आलेल्या बाहेरगावाहून आलेल्या नागरीकांना आल्या पावल्या परतावे लागले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !