हाडाखेड चेकपोस्टवर पंजाब निर्मित 53 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त
शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी : राजस्थानच्या कंटेनर चालकाला बेड्या
Illegal stock of Punjab-made liquor worth 53 lakh seized at Hadakhed check post शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पंजाब राज्यात निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधीत तब्बल 53 लाखांचा अवैध मद्यसाठा हाडाखेड चेक पोस्टवर जप्त केला. याप्रकरणी राजस्थानमधील चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, जप्त मद्यसाठ्यावरील सर्व बारकोड व लेबल खोडण्यात आले असून महाराष्ट्रातील कर चुकवण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे स्पष्ट झाले आहे. नरेशकुमार तोगारामजी जाट (20, कुंडावा, ता.दोरीमन्ना, जि.बाडमेर, राजस्थान) या कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्यात प्रतिबंधीत असलेल्या मद्याची वाहतूक एका कंटेनरमधून होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचला. हाडाखेड चेक पोस्टवर सोमवार, 18 रोजी पहाटे कंटेनर (डी.डी.01 ई.9898) आल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले व वाहन मालकाशी सील तोडण्याबाबत संपर्क केल्यानंतर पोलिसांनी सील तोडल्यानंतर कंटेनरमधून मद्यसाठा जप्त करण्यात आला. कंटेनरमधून 15 लाख 84 हजार रुपये किंमतीची मॅकडॉल नंबर वन, तीन लाख 64 हजार 800 रुपये किंमतीची रॉयल स्टॅग, 13 लाख 68 हजार रुपये किंमतीची रॉयल चॅलेंज व 20 लाख रुपये किंमतीचा कंटेनर असा एकूण 53 लाख 16 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉन्स्टेबल दिनकर पवार यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, संदीप पाटील, सुनील वसावे, संदीप ठाकरे, योगेश मोरे, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, कृष्णा पावरा, चालक संतोष पाटील, चालक अल्ताफ मिर्झा यांच्या पथकाने केली.
