नागपूर अधिवेशनात लोकशाहीचा तमाशा : जळगावात प्रकाश आंबेडकरांचा आरोप
Spectacle of democracy in Nagpur session: Prakash Ambedkar’s allegation in Jalgaon जळगाव : नागपूरात विधी मंडळाचे अधिवेशनात सुरू आहे मात्र तेथील परीस्थिती पाहता हा तर लोकशाहीतील तमाशा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जळगावात बोलताना केला. ते म्हणाले की, नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्याचे वाटत नाही. तिथे सत्ताधारी कोण अन् विरोधक कोण हेच समजत नाही. जे मुद्दे सत्ताधारी पक्षाने मांडले पाहिजेत, ते मुद्दे विरोधक मांडत आहेत आणि जे मुद्दे विरोधकांनी मांडले पाहिजेत ते मुद्दे सत्ताधारी मांडताना दिसून येत आहेत.
मराठा आरक्षणाचा फार्म्यूला आपल्याकडे
मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे तो मांडणार नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी जळगावात केला. नवा सत्ताधारी येऊ द्या. त्यानंतर मी त्यांना मराठा आरक्षणाचा मुद्दा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे सांगेन, असेही आंबेडकर म्हणाले.


काँग्रेसचा कित्ता भाजपा गिरवत आहे
काँग्रेसने भाजपवर पक्ष फोडण्याचा आरोप केला. पण भाजपने नवे काहीच केले नाही. काँग्रेसनेही यापूर्वी अनेक पक्ष फोडले. त्यांनी आमच्यासोबत हेच केले होते. काँग्रेसने जे केले तेच भाजप करत आहे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक असल्याचाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. व्यक्ती म्हणून विचार केला तर नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक आहेत. सरसंघचालक मोहन भागवत व नरेंद्र मोदी मागील वर्षभरात एकमेकांना किती भेटले हे भागवत यांनी स्पष्ट करावे. मोदी आरएसएसच्या जोरावर प्रथम मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधान झाले. पण आता ते याच संघटनेचे तीनतेरा वाजवण्याचे काम करत आहेत, असे त्यांनी सांगितले.





