सातपुड्याच्या अतिदुर्गम आंबापाणीला जिल्हाधिकार्यांची भेट
आंबापाणीच्या विकासाचा जिल्हाधिकार्यांनी मांडला त्रिसूत्री कार्यक्रम
यावल : सातपुडा पर्वतरांगात अतिदुर्गम भागात आंबापाणी (ता.यावल) हा आदिवासी पाडा आहे. या गावातील आरोग्य, शिक्षण व मुलभूत सुविधा जाणून घेण्यासाठी तब्बल 20 किलोमीटरची पायपीट करत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोहोचले. त्यांनी येथील नागरीकांसोबत संवाद साधत येथील समस्या जाणून घेतल्या. आंबापाणी गावाच्या विकासासाठी त्यांनी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी पोहोचणारे जळगाव जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी ठरले आहेत.
सुविधांची केली पाहणी
आंबापाणी, ता.यावल हा आदिवासी पाडा सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात आहे. या गावात जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पायवाटचा रस्ता. रविवारी जिल्हाधिकारी आयुष प्रवाद हे पायपीट करून पोहचले. सोबतच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनीही पायपीट केली. दुर्गम आंबापाणी गावात पायपीट करत पोचणार्या त्या पहिल्या महिला तहसीलदार ठरल्या. आंबापाणीला जाण्यासाठी हरीपुरा गावापासून पायी चालत प्रवास करावा लागतो, परतीचा प्रवास करुन हे अंतर सुमारे 20 किलोमीटर होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाचा निर्धार करत हरीपुरापासून चक्क पायपीट प्रवास करत आंबापाणी गाठले. आंबापाणीला पोहोचल्यावर त्यांनी मतदार यादीतील नोंदणीविषयी माहिती घेतली. मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.


जिल्हा प्रशासनाला दिल्या सूचना
चोपडा मतदारसंघातील हे जिल्हा परीषदेच्या शाळेतील एकमेव कच्चे मतदान केंद्र आहे त्यामुळे जिल्हा परीषदे शाळेचे आणि अंगणवाडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कारणांचा शोध घेवून त्यांची नोंदणी वाढविण्यात यावी, मयत मतदारांची नावे देखील तत्काळ कमी करण्यात यावेत, मतदान केंद्रावर मतदान पथकातील टीम आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा योग्य पद्धतीने नियोजन करण्यात यावे, मतदार केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात यावे. अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
यांची होती उपस्थिती
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी शिक्षकांना दिल्या. ग्रामस्थांनी त्यांची कला, संस्कृती, परंपरा, शिक्षण, उपजिविका, दैनंदिनी अडचणींबद्दल जिल्हाधिकार्यांची यावेळी संवाद साधला. याप्रसंगी यावल निवासी नायब तहसीलदार, निवडणूक तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती. आंबापाणी गावाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता तीन सूत्री कार्यक्रम करण्याबाबत सूचना जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या.
गावाला मिळणार या सुविधा
आंबापाणी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार केल्यानंतर ‘एलजीडी कोड’ देण्यात येईल. यामुळे सदर गाव शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होईल. गावातील व्यक्तींना शंभर टक्के जातीचे दाखले आणि जन्म प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड याबाबत कॅम्प घेऊन काम करण्यात येईल. गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण व आरोग्य विषयक सुविधा यांकरिता लसीकरण शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल. गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्यांचे कामकाज करण्यात येईल. शेतजमीन सपाटीकरण व फळपीक लागवड या विषयांवर काम करण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजना प्रस्तावित करण्यात येणार आहे.





