कोट्यवधींची जागा कवडीमोल भावाने विक्री : पाचोर्‍याचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांचे निलंबन

आमदार किशोर पाटील यांच्या तक्रारीनंतर महसूल मंत्र्यांची घोषणा


Sale of land worth crores at bargain price : Suspension of Tehsildar Praveen Chavanke of Pachora नागपूर : पाचोरा बाजार समितीच्या तारण ठेवलेल्या जागेचा परस्पर ताबा दिल्याचे प्रकरण पाचोरा तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना भोवले असून पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यांनी याप्रकरणी विधानसभेत तक्रार मांडल्यानंतर चव्हाणके यांच्या निलंबनाची घोषणा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी केल्यानंतर राज्याच्या महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा बाजार समितीने 2008 मध्ये जळगाव पीपल्स बँकेकडून कर्ज घेतले होते. 2012 नंतर या कर्जाचे हप्ते अनियमित झाले. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने बाजार समितीची 20 कोटींची मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढली. या जागेचे सरकारी मूल्य नऊ कोटी रुपये असून एका कंपनीने ही जागा तारण घेतली. आमदार पाटील यांच्या वतीने तारण जमिनीला डीआरटी कोर्टात अपिल दाखल करण्यात आले व बुधवारीच या जागेच्या विक्री करण्यास स्थगिती दिली. ही सर्व प्रक्रिया सुरु असताना तहसीलदार यांनी संबंधित कंपनीला या जागेचा ताबा दिला.


जिल्हाधिकार्‍यांमार्फत होणार चौकशी
आमदार किशोर पाटील यांनी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी पाचोरा बाजार समितीला पाच कोटी रुपयांचे कर्ज देण्याची तयारी दर्शवली. यानंतर आमदार पाटील यांनी बुधवारी विधानसभेत हे प्रकरण मांडत पाचोरा तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी केली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना निलंबित करण्याची घोषणा केली. तसेच, या प्रकरणाची जिल्हाधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना विचारणा केली असता आपणास यासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे ते म्हणाले.

बाजार समिती नफ्यात आणून कर्जफेड करणार : आमदार
ही शेतकर्‍यांची मालमत्ता आहे. शेतकर्‍यांची एक इंचही जागा विक्री होऊ देणार नाही, असा आपण शब्द दिला होता. पाचोरा बाजार समिती नफ्यात आणून कर्जफेड केली जाईल, असे पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील यानीं सांगितले.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !